Join us  

आता श्रीलंका आणि मोरिशसमध्ये 'डिजिटल इंडिया'चा डंका; पंतप्रधान मोदींच्या हस्ते UPI लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 4:12 PM

गेल्या काही काळापासून भारतीय UPI ची व्याप्ती सातत्याने वाढत आहे.

नवी दिल्ली: गेल्या काही वर्षांपासून 'डिजिटल इंडिया'चा जगभरात डंका वाजतोय. भारतात तयार झालेल्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसची (UPI) व्याप्तीही सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच फ्रान्समध्ये याची सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर आता आता श्रीलंका आणि मॉरिशसमध्येही UPI लॉन्च झाले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल मीटिंगमध्ये श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI आणि रुपये कार्ड सेवा लॉन्च केली. यावेळी मोदींसह मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हेदेखील उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, हिंद महासागरातील तीन मैत्रीपूर्ण देशांसाठी आजचा दिवस खास आहे. आज आपण आपले ऐतिहासिक संबंध आधुनिक डिजिटल पद्धतीने जोडत आहोत. हा विकासासाठी आमच्या बांधिलकीचा पुरावा आहे. फिनटेक कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून केवळ सीमापार व्यवहारच नव्हे, तर सीमापार संपर्कही मजबूत होतील. 

श्रीलंका आणि मॉरिशचे प्रमुख काय म्हणाले?श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे म्हणाले, हजारो वर्षांपासून आपल्या दोन देशांमध्ये व्यवहार होत आलाय. आता नवीन पद्धतीने हा पुढे जाईल. आज आपले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध आणखी दृध होतील. तर, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ म्हणतात, या निमित्ताने तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होतोय. भारत आणि मॉरिशस यांच्यात शतकानुशतके जुने मजबूत सांस्कृतिक, व्यावसायिक संबंध आहेत. आज हे नाते आणखी मजबूत होत आहे.

मॉरिशसमध्ये RuPay Card लॉन्च होणारभारत सरकारनं 11 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI प्रणाली सुरू केल्याने मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होईल आणि या देशांशी डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढेल. यामुळे भारतीय पर्यटकांना या देशांना भेटी देताना पैसे भरताना कोणतीही अडचण येणार नाही आणि त्या देशांतील नागरिकांना भारतात आल्यावरही पैशांचे व्यवहार करणे सोपे होईल. युपीआय व्यतिरिक्त, रुपेकार्ड सेवा मॉरिशसमध्ये सुरू केली जाईल.  

युपीआयची व्याप्ती वाढतेयगेल्या काही वर्षांपासून, भारतीय अधिकारी जागतिक स्तरावर भारतीय चलन रुपया आणि त्याच्या पेमेंट सिस्टमच्या वापरास प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहेत. रिझर्व्ह बँकेनं जुलै 2022 मध्ये या संदर्भात एक यंत्रणा स्थापन करण्याची घोषणा देखील केली होती ज्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय व्यवहार रुपयांमध्ये करता येतील. जुलै 2022 मध्ये, भारतानं युपीआयला UAE च्या इन्स्टंट पेमेंट प्लॅटफॉर्मशी जोडण्यासाठी एक सामंजस्य करार केला. त्याआधी फेब्रुवारीमध्ये भारत आणि सिंगापूर यांच्यात युपीआय आणि सिंगापूरची फास्ट पेमेंट सिस्टम PayNow ला जोडण्यासाठी करार करण्यात आला होता. याशिवाय UPI द्वारे पेमेंट लागू करण्यासाठी इंडोनेशिया, लॅटिन अमेरिकन आणि आफ्रिकन देशांशीही चर्चा सुरू आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीश्रीलंकाव्यवसायगुंतवणूकबँकिंग क्षेत्र