Join us

मस्तच! 'आधार'च्या माध्यमातून UPI पेमेंट करता येणार, डेबिट कार्डची गरज नाही भासणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 4:16 PM

बँका खातेदारांना युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवेचा वापर करण्यासाठी डेबिट कार्डऐवजी आधार आणि OTP वापरण्याचा पर्याय देखील लवकरच उपलब्ध करुन देणार आहेत.

नवी दिल्ली-

बँका खातेदारांना युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सेवेचा वापर करण्यासाठी डेबिट कार्डऐवजी आधार आणि OTP वापरण्याचा पर्याय देखील लवकरच उपलब्ध करुन देणार आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) हे फिचर पहिल्यांदा सप्टेंबर 2021 मध्ये सादर केलं होतं. ज्या ग्राहकांकडे डेबिट कार्ड नाही किंवा ज्यांचे डेबिट कार्ड सक्रिय झाले नाही, ते या नवीन फिचरमधून UPI सेवा वापरू शकतील, असं अहवालात म्हटलं आहे. बँकेच्या ग्राहकांच्या वतीने NPCI ला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाशी जोडल्याने हे शक्य झालं असल्याचं NPCI च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 

NPCI ने हे फीचर उपलब्ध करुन दिलं होतं. आता ते ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बँकेवर होती. प्रेस रिलीजनुसार, ग्राहकाला युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) वर आणण्यासाठी डेबिट कार्डच्या बदल्यात आधार OTP ऑथिंटिकेशनचा वापर करता येणार आहे. ज्यात डेबिट कार्डसह आधार OTP चाही वापर करता येणार आहे. 

बँकांना १५ मार्चपर्यंत अंमलबजावणी करावी लागणार

नव्या फिचरचा तपशील आणि मार्गदर्शक तत्त्वांसह, अंमलबजावणीची अंतिम मुदत 15 डिसेंबर 2021 निश्चित करण्यात आली होती. इकोसिस्टममधील दुसऱ्या प्रायोरिटी प्रोडक्ट फीचरबाबत सुरू असलेल्या तयारीकडे पाहता अंमलबजावणीची अंतिम मुदत १५ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, आधार क्रमांशी जो मोबाइल क्रमांक जोडला गेलेला आहे. तोच क्रमांक बँकेत नोंदणीकृत असणं गरजेचं आहे. अशा ग्राहकांनाच आधारच्या माध्यमातून UPI पेमेंट सुविधेचा लाभ घेता येऊ शकेल.

सध्या बहुतांश बँक अॅप्लिकेशन्समध्ये ग्राहकांना स्वत:हून डेबिट कार्डने ऑथेंटिकेट करावे लागते. याचा अर्थ असा की ज्यांच्याकडे डिजिटल बँकिंग आहे तेच UPI फीचर वापरू शकतात. 

प्रधानमंत्री जन धन योजनेच्या वेबसाइटनुसार, अशी एकूण ४५ कोटींहून अधिक लाभार्थी खाती आहेत. सुमारे ३० कोटी ग्राहक ग्रामीण आणि अर्ध-ग्रामीण भागात राहतात. तर, केवळ ३१.४ कोटी लाभार्थ्यांना रुपे डेबिट कार्ड मिळाले आहे. याशिवाय अनेक खातेदारांनी त्यांची डेबिट कार्डे सक्रिय केलेली नाहीत.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रव्यवसाय