‘यूपीआय’ हे एक महत्त्वाचं साधन आपल्या सर्वांच्या हाती आलं आहे. यामुळे पैशांचे व्यवहार खूपच सोपे झाले आहेत आणि आपल्या हातातला मोबाइल म्हणजेच जणू एखादे डेबिट कार्ड झाले आहे. यासंदर्भातला मजकूर आपण गेल्या लेखात वाचला. अगदी अशिक्षित माणूसही आज आपल्या हातातल्या मोबाइलच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार अगदी सहजपणे करू लागला आहे; पण हे पैसे इकडून तिकडे जातात तरी कसे?
- आपल्याकडे इंटरनेट असलेला आणि सध्या कार्यरत असलेला एखादा साधा स्मार्ट फोन असला तरी ही सुविधा सहजशक्य आहे. काय करायचं त्यासाठी?
१- पहिल्यांदा ॲप स्टोअरवर जाऊन ‘यूपीआय’ ॲप डाऊनलोड करायचं.
२- तुमचा व्हर्च्युअल आयडी (पेमेंट ॲड्रेस), नाव, पासवर्ड टाकून तुम्ही तिथे आपलं प्रोफाइल तयार करू शकता.
३- ॲड/लिंक/मॅनेज बँक अकाउंट या पर्यायावर क्लिक करून आपली बँक आणि खाते क्रमांक व्हर्च्युअल आयडीशी लिंक करायचा.
४- एकापेक्षा जास्त बँकांमध्ये तुमचं खातं असेल तर ज्या बँकेच्या खात्यातून व्यवहार व्हावेत, असं आपल्याला वाटतं, त्या बँकेचा पर्याय निवडायचा.
५- ज्या बँक खात्याशी तुम्ही आपला मोबाइल क्रमांक लिंक केलेला आहे त्या बँकेकडून तुम्हाला एक ओटीपी पाठविण्यात येईल. ओटीपी क्रमांक आणि तुमच्या पसंतीचा यूपीआय पिन टाकून ‘सबमिट’ बटन दाबल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल.
सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाइलवरून कुठेही, केव्हाही आर्थिक व्यवहार करू शकता. अतिशय सहज, सोप्या या पद्धतीमुळे अनेकांच्या आर्थिक वागणुकीतच आमूलाग्र बदल घडून आला आहे.
यूपीआय सिस्टीममुळे केवळ एका मोबाइल ॲपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या अनेक बँक खात्यांतून व्यवहार करू शकता. शिवाय ही सुविधा अक्षरश: २४ तुमच्या सेवेसाठी तत्पर असते. यामुळे तुम्हाला तुमच्या हातात प्रत्यक्ष पैसे असण्याची गरज नाही, तुम्हाला बँकेत जावं लागत नाही. तुमच्या जर काही तक्रारी असतील, तर त्याही मोबाइल ॲपच्या मदतीनंच तुम्ही नोंदवू शकता. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सारे व्यवहार करण्यासाठी तुम्हाला सध्या तरी काहीही चार्ज द्यावा लागत नाही.