America: जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला अमेरिका देश अडचणीत सापडला आहे. अमेरिकेवर असलेले कर्ज गेल्या 24 वर्षांत सहा पटीने वाढले आहे. सन 2000 मध्ये अमेरिकेवर 5.7 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज होते, जे आता 34.2 ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचले आहे. यूएस काँग्रेसच्या बजेट दस्तऐवजानुसार, पुढील दशकापर्यंत देशाचे कर्ज $54 ट्रिलियनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. गेल्या तीन वर्षांत कर्जात 10 ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
रिपोर्टनुसार, सरकारचे उत्पन्न घटत असून खर्च वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. तज्ज्ञांच्या मते ही अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी चांगली गोष्ट नाही. असे मानले जात आहे की, अमेरिकेचे कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर पुढील काही वर्षांत 200 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. म्हणजे देशाचे कर्ज अर्थव्यवस्थेच्या दुप्पट होईल. असे झाले तर कर्ज फेडण्यात अमेरिकेला खुप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल.
यामुळे सरकारला संशोधन आणि विकास, पायाभूत सुविधा आणि शिक्षणावर होणाऱ्या एकूण खर्चापेक्षा व्याज भरण्यासाठी जास्त पैसा खर्च करावा लागेल. देशाची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असताना आणि बेरोजगारी कमी असताना अमेरिकेचे कर्ज वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. सामान्यतः, जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत असते तेव्हा सरकार विकासाला चालना देण्यासाठी खर्च वाढवते.
वाढत्या कर्जाबाबत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटमध्ये अनेकदा वाद होतात. मात्र, दोन्ही पक्षांच्या कार्यकाळात देशातील कर्ज वाढले आहे. त्याचा परिणाम देशाच्या पतमानांकनावर दिसू लागला आहे. Fitch ने ऑगस्टमध्ये अमेरिकेच्या कर्जाचे रेटिंग AA+ वरून AAA पर्यंत कमी केले. तसेच नोव्हेंबरमध्ये मूडीजने अमेरिकेच्या AAA मध्ये कपात करण्याचा इशारा दिला होता. गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिका डिफॉल्टच्या उंबरठ्यावर पोहोचली होती, आता पुन्हा एकदा ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये निव्वळ व्याज, गेल्या वर्षीच्या तुलनेत 39 टक्क्यांनी वाढला आहे, तर 2020 च्या तुलनेत दुप्पट झाले आहे.