Google Chrome : इंटरनेटवर सर्च करण्यासाठी गुगलचे क्रोम (Chrome) ब्राउजर वापरले नाही असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. देशात तर कुठलीही अडचण निर्माण झाली तर पहिला उपाय गुगलवर शोधला जातो. मात्र, याच ब्राउझरमुळे कंपनी अडचणीत सापडली आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (DOJ) Google विरुद्ध सुरू असलेल्या अविश्वास प्रकरणात गुगलला त्याचे क्रोम ब्राउझर विकण्यास भाग पाडण्यासाठी न्यायालयाला विनंती करण्याचा विचार करत आहे. सर्च मार्केटमध्ये गुगलने बेकायदेशीरपणे मक्तेदारी कायम ठेवली असल्याचा आरोप अविश्वास प्रकरणात करण्यात आला आहे. क्रोम हा जगातील सर्वाधिक वापरला जाणारा ब्राउझर आहे. गुगल याचा वापर त्यांच्या उत्पादनाचा प्रसार करण्यासाठी करत असल्याने स्पर्धा निकोप राहिली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गुगलची सर्च मक्तेदारी इतर स्पर्धकांना हानी पोहोचवत असल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त, गुगल क्रोमचा वापर त्यांच्या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी होत असल्याने प्रतिस्पर्ध्यांना बाजारपेठेत प्रवेश करण्याची आणि वाढण्याची संधी कमी होत आहे.
यावर गुगल नियामक प्रकरणांचे उपाध्यक्ष ली-अॅन मुलहोलँड यांनी ब्लूमबर्गला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की "न्याय विभाग या प्रकरणात कायदेशीर समस्यांपेक्षा एक कट्टरपंथी अजेंडा राबवत आहे". गुगलचे म्हणणे आहे की हे पाऊल कंपनीच्या स्पर्धात्मक वातावरणावर विपरित परिणाम करू शकते. याचा उद्योगावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
गुगलवर लागू होऊ शकतात नियम
या प्रकरणात अमेरीकन न्याय विभाग गुगलला काही महत्त्वाचे बदल करण्याची मागणी करू शकते. यामध्ये गुगलकडे अँड्रॉइडला सर्च आणि गुगल प्लेपासून वेगळे करण्याची अट समाविष्ट केली आहे. मात्र, गुगलला अँड्रॉइड विकण्याची सक्ती केली जाणार नाही. याव्यतिरिक्त, Google ला जाहिरातदारांसह अधिक माहिती सामायिक करावी लागेल आणि त्यांच्या जाहिराती कुठे दाखवल्या जातील हे ठरवण्याचा अधिकार त्यांना द्यावा लागेल.
गुगलने वेबसाइटसाठी अधिक पर्याय उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरुन गुगलच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स उत्पादनांद्वारे त्यांची सामग्री वापरण्यापासून रोखता येईल, अशी न्याय विभागाची इच्छा आहे. याव्यतिरिक्त, गुगल अविश्वास प्रकरणात प्रतिस्पर्ध्यांना नुकसान करणाऱ्या आणि कळीचे मुद्दे असलेल्या गोष्टी रोखण्यास सांगितले जाऊ शकते.