- प्रसाद गो. जोशी, शेअर समालोचन
नवीन संवत्सराची झालेली नकारात्मक सुरुवात, टाटा ग्रुपमधील धुसफूस, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे अचानक जड झालेले पारडे, जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले निराशाजनक वातावरण व परकीय वित्तसंस्थांकडून झालेली मोठी विक्री यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सप्ताहामध्ये निर्देशांक ६६७ अंशांनी घसरून चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. वस्तू सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये दर ठरविण्याबाबत झालेली सहमती हीच काय ती या सप्ताहामधील सकारात्मक बाब होय. गत रविवारी विक्रम संवत २०७३च्या मुहूर्ताचे सौदे झाले. मात्र या सौद्यांच्या वेळीच बाजार घसरला. संपूर्ण सप्ताहामध्येच निर्देशांक घसरत राहिला. सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ६६७.३६ अंश म्हणजेच २.३८ टक्क्यांनी घसरून २७२७४.१५ अंशांवर बंद झाला. बाजाराने गेल्या चार महिन्यांमधील गाठलेली ही नीचांकी पातळी आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी)मध्येही मोठी घसरण झाली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक २०४.२५ अंश म्हणजेच ०.३६ टक्के खाली आला. सप्ताहाच्या अखेरीस निफ्टी ८४८४.९५ अंशांवर बंद झाला. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीचा सर्वाधिक प्रभाव जगभरातील शेअर बाजारांवर पडला आहे. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे निवडून येण्याची शक्यता वाढल्याने बाजाराची चिंता वाढली आहे. डेमॉक्रॅटीक उमेदवाराच्या निवडीमुळे अमेरिकेची आर्थिक धोरणे फारशी बदलणार नाहीत अशी अपेक्षा होती. मात्र अचानक ट्रम्प यांचे पारडे जड झाल्याने बाजारावर विक्रीचे मोठे दडपण येऊन जगभरातील बाजार खाली आले. त्यातच बँक आॅफ इंग्लंडने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्यानेही बाजार काहीसा धास्तावला. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याच्या सार्वमतावर पार्लमेंटचे शिक्कामोर्तब होणार असल्याने ही भूमिका घेतल्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यापासून भारतीय शेअर बाजारामध्ये सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहामध्ये आक्रमकपणे विक्री चालूच ठेवली. अवघ्या चार दिवसांमध्ये या संस्थांनी २१०० कोटी रुपयांच्या समभाग आणि रोख्यांची विक्री करून बाजाराची घसरण आणखी वाढविली. जीएसटी परिषदेमध्ये जीएसटीच्या दराबाबत झालेले एकमत ही एकमात्र सकारात्मक घटना गतसप्ताहामध्ये घडली. मात्र नकारात्मक वातावरणात या घटनेचा प्रभाव जाणवलाच नाही.