US Fedral Reserve : अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली आहे. दोन दिवसांच्या बैठकीनंतर बुधवारी ही घोषणा करण्यात आली. फेड रिझर्व्हकडून व्याजदरात ५० बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली आहे. मार्च २०२० नंतर प्रथमच व्याजदरात कपात करण्यात आली आहे. अमेरिकेच्या व्याजदरात कपातीचा परिणाम गुरुवारी भारतासह जगभरातील शेअर बाजारात दिसून येण्याची शक्यता आहे. यामुळे शेअर बाजाराला गती मिळू शकते, असं मानलं जात आहे.
या कपातीपूर्वी फेड रिझर्व्हचा व्याजदर ५.२५ ते ५.५ टक्क्यांदरम्यान होता, जो २३ वर्षांतील उच्चांकी होता. व्याजदरात कपातीच्या घोषणेनंतर नवे व्याजदर ४.७५ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान असतील. महागाईच्या पार्श्वभूमीवर व्याजदर कमी करण्यासाठी अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेवरही दबाव होता.
बाजारावर काय परिणाम होणार?
फेडरल रिझर्व्हनं व्याजदरात कपात केल्यानं अमेरिकेतील सरकारी बॉन्ड्सवरील व्याजदरही कमी होतील. तसे झाल्यास गुंतवणूकदार आपला पैसा बॉन्ड्समध्ये गुंतवण्याऐवजी शेअर बाजारात गुंतविणे पसंत करतील. सध्या भारताचा शेअर बाजार जगभरातील गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवत आहे. कमी व्याजदरामुळे भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूक वाढू शकते, ज्यामुळे बाजाराला गती मिळण्याची शक्यता आहे.
सोन्याच्या किंमतीत येणार तेजी?
फेड रिझर्व्हनं व्याजदरात कपात करण्याच्या घोषणेनंतर सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळू शकते. खरं तर सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं. अमेरिकन गुंतवणूकदार आता सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतील. यामुळे सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे, तसंच त्याच्या किंमतीतही वाढ होईल. अशा तऱ्हेने सोन्याचा भाव नवा उच्चांक गाठू शकतो.