वॉशिंग्टन : इराणविरोधात 5 नोव्हेंबरपासून नव्याने लागू होत असलेल्या निर्बंधांतही भारतासह आठ देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सवलत देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची संपूर्ण कोंडी करण्यासाठी बँकिंग, एनर्जी आणि शिपिंग इंडस्ट्रीवर निर्बंध लावले आहेत.
इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी आठ देशांना तात्पुरत्या स्वरूपाची सवलत देण्यात आली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी याबाबतची माहिती दिली. 20 देशांनी इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे बंद केले आहे. इराणच्या तेल खरेदीत 10 लाख बॅरल प्रतिदिन कमतरता झाली आहे, असेही माइक पॉम्पिओ यांनी सांगितले.
दरम्यान, भारतासह चीन, ग्रीस, इटली, तैवान, जपान, तुर्की आणि दक्षिण कोरिया या देशांना इराणकडून कच्चे तेल खरेदी करण्याची सवलत देण्यात आली आहे. इराणकडून तेल खरेदी पूर्णत: थांबविण्याचे निर्देश प्रशासनाने जगभरातील देशांना दिले होते. परंतु इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या भारतासारख्या काही देशांनी याला आक्षेप घेतला होता.