Semiconductors in India : गेल्या काही वर्षात सेमीकंडक्टर चीप हा शब्द सातत्याने तुमच्या वाचण्यात किंवा ऐकण्यात आला असेल. जगभरातील जवळपास सर्वच वाहनांमध्ये नखाएव्हढ्या आकाराची ही चीप पाहायला मिळते. सध्याच्या घडीला सेमीकंडक्टर चीपचे उत्पादन करण्यात चीन आघाडीवर आहे. निम्म्याहून अधिक जगाला चीनच चीप्स पुरवत आहे. त्यामुळे चीनचा या क्षेत्रात दबदबा निर्माण झाला आहे. ड्रॅगनची या क्षेत्रातील मक्तेदारी संपवण्यासाठी भारताने पहिलं पाऊल टाकलं आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला आहे. सेमीकंडक्टर्सवर दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आहे. अमेरिकेच्या सहकार्यामुळे भारताला सेमीकंडक्टर चीपचा जागतिक पुरवठा साखळी बनण्यास मदत होईल. सध्या सेमीकंडक्टर क्षेत्रावर चीनचं वर्चस्व कायम आहे. मात्र, भारत आणि अमेरिका एकत्र आल्याने ते फार काळ टीकणार नाही.
यूएस स्टेट डिपार्टमेंटने जागतिक सेमीकंडक्टर इकोसिस्टममध्ये विविधता आणण्यासाठी भारतासोबत करार करण्याचे ठरवले आहे. अमेरिकेचे हे पाऊल भारताच्या सेमीकंडक्टर मिशनला बळकट करणार आहे. यामुळे जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीचे चीनवरील अवलंबित्व कमी होणार आहे.
चीनचे साम्राज्य संपणारभारत आणि अमेरिका यांच्यात भागीदारी झाल्याने ड्रगनला धक्का बसला आहे. या करारातून भारताच्या विद्यमान सेमीकंडक्टर इकोसिस्टम आणि नियामक फ्रेमवर्कचे विश्लेषण केले जाईल. देशाच्या सेमीकंडक्टर वर्कफोर्स आणि पायाभूत सुविधांच्या गरजा समजून घेण्यासाठी अमेरिका मदत करणार आहे. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताची प्रगती पाहून चीनचे टेंशन वाढलं असणार हे नक्की.
काय आहे सेमीकंडक्टर चीप?गेल्या काही वर्षांत वाहन क्षेत्रात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. वाहने आता चालकाशिवाय चालू लागली आहेत. यामध्ये सेमीकंडक्टर चीपने तंत्रज्ञानाच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे भविष्यात जागतिक स्तरावर ताकद वाढवण्यासाठी भारताला आधी सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रभुत्व मिळवावे लागेल. सेमीकंडक्टर ही एक विशेष प्रकारची संरचना असून, ती विद्युत प्रवाह नियंत्रित करण्याचे काम करतात. सिलिकॉनपासून याची निर्मिती केली जाते. बोटाच्या नखाएव्हढा आकार असलेली ही चीप संपूर्ण वाहन नियंत्रित करण्यात मोठी भूमिका बजावते. ही चिप अनेक हायटेक उपकरणांमध्ये बसवली जाते. यामुळे याला इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा मेंदूदेखील म्हणतात.