Join us

अमेरिकी शेअर बाजार उघडताच कोसळला; भारतीय बाजाराचेही उद्या काही खरे नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 20:16 IST

एलन मस्क आणि ट्रम्प यांच्या पोतडीतून उगवलेले टेरिफ वॉर जगाला मंदीच्या दिशेने घेऊन चालले आहे, सर्व कंपन्या, गुंतवणूकदार आणि देश धास्तावलेले आहेत.

गेल्या काही वर्षांत एका पेक्षा एक असे विक्रम करत वरती वरती चाललेला शेअर बाजार आता कोसळू लागला आहे. सोन्यानेही आता नांगी टाकायला सुरुवात केली आहे. जगाच्या क्षितीजावर उगवलेला नवा राजा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याला कारण आहेत. एलन मस्क आणि ट्रम्प यांच्या पोतडीतून उगवलेले टेरिफ वॉर जगाला मंदीच्या दिशेने घेऊन चालले आहे, सर्व कंपन्या, गुंतवणूकदार आणि देश धास्तावलेले आहेत. याच भितीने आज सकाळी भारतात शेअर बाजार कोसळला, तर अमेरिकेतही पहिल्याच दिवशी शेअर बाजार उघडता उघडता दणकून कोसळला आहे. 

अमेरिकेच्या शेअर बाजारात सुरु होताच लाल निशान दिसू लागले आहे. जपळपास ५ टक्क्यांपेक्षा जास्त कोसळला आहे. वॉल स्ट्रीटची सुरुवातच धडाम या आवाजाने झाली आहे. ट्रम्प यांनी टेरिफ वॉर सुरु केल्याने गुंतवणूकदार धास्तावले असल्याचे हे चित्र आहे. याचाच परिणाम जगातील सर्वच शेअर बाजारांवर दिसत आहे. उद्या भारतातही शेअर बाजाराची सुरुवात आजच्यासारखीच लाल रंगात होणार आहे. सर्वत्र अनिश्चितता पसरली असून सेफ म्हटले जाणारे सोने देखील कोसळू लागले आहे. सोशल मीडियावर आता एफडी वाले लोकच सुरक्षित असल्याची खिल्ली उडविली जात आहे. 

डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरी १,२१२.९८ अंकांनी घसरून ३.१७% ने ३७,१०१.८८ वर पोहोचला होता. S&P 500 निर्देशांक 181.37 अंकांनी किंवा 3.57% ने घसरून 4,892.71 वर पोहोचला. नॅस्डॅक कंपोझिटदेखील ४ टक्क्यांनी म्हणजेच ६२३.२३ अंकांनी कोसळला आहे. गुंतवणूकदार अमेरिकेच्या व्यापार धोरणांबद्दल साशंक असल्याने आता जगभरात पैशांचा पुरता चुराडा होताना दिसत आहे. 

टेरिफ धोरणांचा जागतिक व्यापारावर परिणाम होणार आहे, यामुळे अमेरिकी कंपन्यासुद्धा प्रचंड दबावाखाली आहेत. अशा या अस्थिर काळात सोन्यानेही साथ सोडल्याचे चित्र आहे. ट्रम्प तिकडे आपल्यामुळे महागाई कमी होतेय, व्याज दर कमी होतायत अशी शेखी मिरवत आहेत. परंतू, ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कामुळे मंदीची भीती आणखी वाढली आहे. याचाच परिणाम आता बाजारांवर दिसू लागला आहे. 

टॅग्स :अमेरिकाडोनाल्ड ट्रम्पशेअर बाजार