वॉशिंग्टन : अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार एच १ बी वर्क व्हिसाची संख्या वाढविणे किंवा कमी करणे आवश्यक आहे, असे अमेरिकेच्या एका प्रमुख सिनेट सदस्याने म्हटले आहे. हा व्हिसा भारतीय तंत्रज्ञ आणि आय कंपन्यांत प्रचंड लोकप्रिय आहे. उत्तर कॅरोलिनाचे सिनेट सदस्य थॉम टिलिस यांनी आर्थिक कंपन्यांच्या मुद्यावर सिनेटच्या सुनावणीदरम्यान मंगळवारी ही टिपणी केली. टिलिस म्हणाले की, ‘यांची (एच १ बी व्हिसा) संख्या अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार काही पदांवर नियुक्तीसाठी वाढविण्याची आणि कमी करण्याची गरज आहे.’ आपल्या उद्योगांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिकेत पुरेसे पात्र लोक उपलब्ध आहेत का, याची माहिती ते समितीसमोर हजर झालेल्या तज्ज्ञांकडून जाणून घेऊ इच्छित होते. तीन ते साडेतीन टक्के सकळ राष्ट्रीय उत्पन्नासाठी देशात एच १ बी व्हिसाची गरज भागविण्यासाठी देशात पुरेशा संख्येत पात्र लोक आहेत काय, असा सवाल त्यांनी केला.
त्यावर हॉर्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्रोफेसर विल्यम स्प्रिग्स म्हणाले की, अमेरिकेने अमेरिकी लोकांमध्ये पुरेशी गुंतवणूक करणे सुरू ठेवले तर हे शक्य आहे. जर आम्ही अमेरिकी मुलांमध्ये पुरेशी गुंतवणूक करण्याकडे परत फिरलो, त्यांच्यावर विश्वास ठेवला तर आम्ही त्यांना कामासाठी पुरेशा रीतीने प्रशिक्षित करू शकतो. घसरणीच्या काळात आम्ही एकीकडे उद्योगातील कर्मचाऱ्यांना हाकलत होतो तर दुसरीकडे व्हिसा कर्मचाऱ्यांना आयात करीत होतो. त्याचवेळी आम्ही नोकऱ्यांसाठी अधीर विद्यार्थ्यांना पदवीधर बनविणे सुरूच ठेवले होते.
आज तरुण वर्ग ज्या क्षेत्रात एच १ बी व्हिसाधारकांना नियुक्त केले जात नाही त्या क्षेत्राचे शिक्षण घेणे पसंत करीत आहे. तेथे त्यांना स्पर्धा करावी लागत नाही. माझा मुलगा यामुळेच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करीत आहे, असेही ते म्हणाले. कर्मचाऱ्यांकडे नेहमीच नागरिकत्व प्राप्त करण्याचा पर्याय असायला हवा. सर्व प्रकारचे व्हिसा कार्यक्रम देशात आलेले परदेशी कर्मचारी त्याचप्रमाणे देशातील कर्मचारी या दोघांचेही शोषण करतात, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
भारतीय वंशाच्या दोघांवर आरोप
भारतीय तंत्रज्ञांसाठी एच १ बी व्हिसा मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या दोन अमेरिकी नागरिकांवर अमेरिकेतील एका न्यायालयात आरोप ठेवण्यात आला आहे.
जयवेल मुरुगन (४६) आणि सय्यद नवाज (४०) अशी आरोपींची नावे आहेत. दोष सिद्ध झाल्यास त्यांना २० वर्षांचा कारावास किंवा अडीच लाख डॉलरचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
एच १ बी व्हिसाचे लॉटरीप्रणालीनेच होणार वितरण
एच १ बी व्हिसाच्या लॉटरी पद्धतीने वितरणास आव्हान देणारी याचिका अमेरिकी न्यायालयाने फेटाळली.
२०१८ या आर्थिक वर्षासाठी एच-१ बी व्हिसा वितरित करण्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, असा या निकालाचा अर्थ आहे.
एच -१ बीसाठी मंजूर संख्येहून अधिक अर्ज प्राप्त होतात. त्यामुळे व्हिसा वितरणासाठी लॉटरी पद्धतीने निवड केली जाते.
अमेरिकेच्या गरजेनुसार ‘एच१बी’ व्हिसा मिळणार
अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार एच १ बी वर्क व्हिसाची संख्या वाढविणे किंवा कमी करणे आवश्यक आहे
By admin | Published: March 30, 2017 01:05 AM2017-03-30T01:05:25+5:302017-03-30T01:05:25+5:30