सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड संस्था (ईपीएफओ) कडून देशातल्या चार कोटींहून अधिक कर्मचारी भविष्य निधीधारकांसाठी एक शुभवर्तमान आहे. आपले हक्काचे घर खरेदी करण्यासाठी प्रॉव्हिडंट फंडातली जमा रक्कम तारण ठेवणे अथवा मासिक हप्ता भरण्यासाठी या रकमेचा वापर करण्याची अनुमती देणारी योजना लवकरच आणली जाणार आहे.
या योजनेची माहिती देताना केंद्रीय श्रम सचिव शंकर अग्रवाल म्हणाले, ‘केद्रीय श्रममंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुढल्या महिन्यात ईपीएफओ विश्वस्थांची बैठक होणार आहे. या बैठकीत भविष्य निर्वाह निधीत ज्यांची रक्कम जमा आहे, अशा भागधारक कर्मचाऱ्यांना प्रॉव्हिडंट फंडातली जमा रक्कम तारण ठेवण्यास अथवा घर खरेदी कर्जाचा मासिक हप्ता भरण्यास या रकमेचा वापर करण्याची किंवा मासिक हप्त्याची रक्कम थेट प्रॉव्हिडंट फंडाच्या खात्याशी संलग्न करण्याची अनुमती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे.’
ईपीएफओचे केंद्रीय विश्वस्थ बोर्डाच्या (सीबीटी) गतवर्षी
१६ सप्टेंबरमध्ये झालेल्या बैठकीत प्रॉव्हिडंड फंडातल्या रकमेचा
वापर कर्मचाऱ्यांना गृहकर्जासाठी करता आला पाहिजे, या आशयाचा प्रस्ताव चर्चेसाठी आला होता.
त्यानंतर, या योजनेचे तपशील तयार करण्यात आले.
ही योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, ईपीएफओ केंद्रीय विश्वस्थ बोर्डाच्या मंजुरीनंतर योजना भागधारकांसाठी खुली होईल. कोणत्या भागधारकाला किती रकमेपर्यंत जमा रक्कम तारण ठेवता येईल अथवा किती रकमेपर्यंत मासिक हप्ता भरण्याची कर्मचाऱ्याची पात्रता आहे, याचे सविस्तर तपशील व योजनेबाबत अन्य माहिती मंजुरीनंतर जाहीर केली जाईल, असेही अग्रवाल यांनी नमूद केले.
>देशातील कर्मचाऱ्यांसाठी फायद्याची योजना
प्रॉव्हिडंट फंड धारकांवर कोणतीही गृहनिर्माण योजना ईपीएफओ लादू इच्छित नाही, असे स्पष्ट करीत अग्रवाल म्हणाले, ईपीएफओ भागधारकांसाठी ना जमीन खरेदी करणार आहे ना कोणतीही गृहनिर्माण योजना राबवणार आहे.
प्रस्तावित योजनेनुसार पीएफ धारक कर्मचाऱ्याला खुल्या बाजारपेठेतून आपल्याला आवडणारे घर निवडण्याचा हक्क असून, त्यासाठी पीएफ फंडातल्या आपल्या जमा रकमेचा वापर करण्यासाठी तो मुक्त असेल.