मुंबई - देशात गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन आणि कॅशलेस पैसे पाठवण्याची सुविधा आल्याचा फायदा होत असला तरीही आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने फटकाही बसू लागला आहे. देशातील ३९% कुटुंबांची गेल्या तीन वर्षांत आर्थिक फसवणूक झाली असून, त्यातील केवळ २४% कुटुंबांना त्यांचे पैसे परत मिळाले असल्याचे अहवालात समोर आले आहे.
सर्वाधिक फटका कुणाला? सर्वाधिक आर्थिक फसवणूक ही क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे करण्यात आली आहे. २३% जणांना याचा फटका बसला आहे. १३% लोकांची खरेदी-विक्री आणि इतर साइटद्वारे फसवणूक झाली आहे. १३% संकेतस्थळांनी साहित्य डिलिव्हरीच्या नावाखाली ऑनलाइन पैसे घेतले; पण वस्तू डिलिव्हरी केले नाही. १०% जणांनी एटीएम कार्डद्वारे फसवणूक, इतर १०% जणांनी बँक खाते फसवणूक तर १६ टक्के जणांनी इतर मार्गाने फसवणूक झाल्याचे सांगितले.
फसवणुकीत किती वाढ? गेल्या वर्षाच्या तुलनेत फसवणुकीची तक्रार करणाऱ्यांची टक्केवारी २०२२ (मागील ३ वर्षे) च्या तुलनेत २०२३मध्ये किंचित कमी झाली.त्याच वेळी, क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे फसवणुकीची तक्रार करणाऱ्या लोकांची टक्केवारी गेल्या वर्षीच्या १८% वरून २३%वर पोहोचली आहे.