Join us  

पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 2:54 PM

ATM Card Insurance : देशांतील बहुतांश लोकांना एटीएम कार्डवर मिळणाऱ्या विम्याची माहिती नसते हे वास्तव आहे. पाहा काय आहेत बँकांचे नियम.

ATM Card Insurance : ऑनलाईन व्यवहारांचा वापर वाढल्याने एटीएम कार्डाचा वापर कमी होऊ लागला आहे. जवळ रोकड बाळगण्याची गरज न उरल्याने एटीएमकडे कुणी फिरकत नाही. परंतु इतरही अनेक कामांसाठी एटीएम कार्डाचा वापर करता येतो याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अनेकांना पैसे काढण्याव्यतिरिक्त एटीएम कार्डाचा इतरही काही उपयोग असतो हे माहित नसते. परंतु देशांतील बहुतांश लोकांना एटीएम कार्डवर मिळणाऱ्या विम्याची माहिती नसते हे वास्तव आहे. 

काय आहेत बँकांचे नियम? 

खातेधारकाला ज्यावेळी बँकेकडून एटीएम कार्ड जारी केले जाते त्याच दिवसांपासून अपघाती विमा आणि अवेळी मृत्यू आल्यास जीवन विमा लागू होतो. ही सेवा बँकांकडून मोफत दिली जाते. यासाठी बँकेकडे कोणतीही अधिकची कागदपत्रे जमा करावी लागत नाहीत. 

कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड असो, त्याचा ४५ दिवसांपासून अधिक काळासाठी खातेधारकाकडून वापर झाला असेल तर त्याला कार्डवर मोफत विमा संरक्षण मिळते. यात अपघात आणि जीवन विमा या दोन्हींचा समावेश असतो. 

काही बँकांकडून या लाभासाठी काही व्यवहारांची अट घातली आहे. बँकांसाठी ही संख्या वेगवेगळी असू शकते. विमा पॉलिसी अॅक्टिवेट करण्यासाठी ३० दिवसांत कार्डचा किमान एकदा वापर झाला पाहिजे, अशी अट घातली आहे. तर काही बँकांनी १० दिवसांत कार्डच्या आधारे एक व्यवहार झाला पाहिजे, असे बंधन घालण्यात आले आहे. 

किती विमा संरक्षण मिळते? 

खातेधारकाने घेतलेल्या कार्डाच्या श्रेणीनुसार या विमा संरक्षणाची रक्कम निश्चित केली जात असते. उदाहरणार्थ एसबीआय गोल्ड कार्ड धारकाला मृत्यू झाल्यास ४ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते तर अपघात प्रकरणात २ लाखांचे रक्षण दिले जाते. 

निरनिराळ्या बँकांकडून एटीएम कार्डावर देण्यात येणाऱ्या विमा कव्हरेजच्या रकमेत फरक असतो. काही डेबिट कार्डावर तीन कोटी रुपयांपर्यंत मोफत अपघाती विमा दिला जातो.

टॅग्स :बँकपैसा