Join us

इन्कम टॅक्स वेबसाइटचा असा करा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2023 10:11 AM

कायद्याने तुमचा कर कापून जर कोणी सरकारला भरला नाही, तर त्यामुळे तुमची जबाबदारी टळत नाही.

- अजित जोशी, चार्टर्ड अकाउंटंट

इन्कम टॅक्स वेबसाइट, गेल्या १२-१५ वर्षांपासून आयकरात तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करण्याचं मोठं काम करत आहे. प्रत्येक करदात्याने त्याचा वापर करायला हवा. सर्वांत पहिलं म्हणजे आपलं खातं या वेबसाइटवर उघडून घ्या. तुमचा पॅन हेच इथे तुमचं युजरनेम असतं. सुरुवातीला नोंदणी करताना आधार, पॅन, पत्ता, ई-मेल, मोबाइल नंबर वगैरे तपशील द्यावे लागतात. सामान्य पगारदार किंवा छोट्या-मोठ्या व्यावसायिक करदात्यांना याचा उपयोग तीन प्रकारे होतो. पहिलं म्हणजे अर्थात विवरण किंवा रिटर्न सादर करायला. मात्र, ती प्रक्रिया गेल्या वर्ष-दोन वर्षांत बऱ्यापैकी जटिल केलेली आहे, त्यामुळे तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या. दुसरा उपयोग होतो तुम्हाला काही नोटिसा आलेल्या असतील किंवा उच्च मूल्य व्यवहाराची काही माहिती हवी असेल तर ई-मेलशिवाय आयकर खातं इथेही त्याची नोंद करतं. ई- मेलचा गोंधळ होऊ शकतो, तेव्हा महिन्यात एकदा तरी लॉगिन करून तपासून पाहा, पण सर्वांत महत्त्वाचा उपयोग आहे तो म्हणजे इथे मिळणारी 26AS, AIS किंवा TIS ही स्टेटमेंटस. यापैकी 26AS मध्ये तुमचा जेवढा कर कापलेला असेल आणि तुमच्या नावाने सरकारला भरलेला असेल, त्या टीडीएसची सविस्तर माहिती मिळते. हे अत्यंत महत्त्वाचं आहे.

कायद्याने तुमचा कर कापून जर कोणी सरकारला भरला नाही, तर त्यामुळे तुमची जबाबदारी टळत नाही. त्यामुळे वेळोवेळी तुमचे एम्प्लॉयर किंवा गिऱ्हाईक तुमचा कर कापत असतील तर तुमच्या नावे सरकारला भरत आहेत ना, हे पाहणं आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला व्याज आणि दंडही लागू शकतो. त्याच व्यवहारांची अधिक विस्तृत माहिती TIS वर असते. तुम्ही तुमचा पॅन असंख्य वेगवेगळ्या ठिकाणी, मग ते शेअर्स असो, म्युच्युअल फंड, एफडी किंवा जमीनजुमल्याचे व्यवहार, यात देत असता. हे सगळे व्यवहार आयकर खात्याकडे त्या त्या सरकारी यंत्रणेकडून जात असतात.

- खात्याला माहीत असलेले सगळे व्यवहार नोंदले जातात ते AIS मध्ये.

- थोडक्यात, ही स्टेटमेंट्स म्हणजे आयकर खात्याकडे असलेली तुमची कुंडली असते. तेव्हा रिटर्न सादर करताना यात नोंदवल्या गेलेल्या सगळ्या व्यवहारांचा हिशेब आलेला आहे ना, याची खात्री करा, ते आवश्यक आहे.

 

टॅग्स :इन्कम टॅक्स