लंडन : भारत व चीनमध्ये मोबाईल बँकिंगचा वापर झपाट्याने वाढत असल्यामुळे मोबाईलचा बँकिंग व्यवहारासाठी वापर करणाऱ्यांची जगातील संख्या येत्या चार वर्षांत दुप्पट होऊ शकते, असा निष्कर्ष अभ्यासाद्वारे काढण्यात आला आहे.
मोबाईल बँकिंग पद्धत स्वीकारण्याचे प्रमाण विकसनशील देशांत सर्वाधिक आहे. भारत आणि चीनमध्ये हे प्रमाण ६०-७० टक्क्यांपर्यंत पोहोचले असून या दोन देशांनी अमेरिका, ब्रिटन व कॅनडाला मागे टाकले आहे. केपीएमजी या जागतिक सल्लागार संस्थेने युबीएस लॅबकडून देण्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढला आहे. केपीएमजीने आपल्या ग्लोबल मोबाईल बँकिंग रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, इतर तंत्रज्ञानाचा उपयोग करून मोबाईल बँकिंग आणि फेडीच्या पद्धतींचे अधिकाधिक प्रमाणात समायोजन करण्यात येत असून त्यामुळे खुल्या बँकिंग पर्वाचा बिगुल वाजला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अनेक बँका मोबाईल बँकिंगला प्राधान्य देत असून या क्षेत्रात निकोप स्पर्धेला अधिक वाव आहे, असे केपीएमजी इंडियाच्या माहिती तंत्रज्ञान सल्लागार सेवेचे प्रमुख अखिलेश टुटेजा यांनी सांगितले. स्पष्ट मोबाईल बँकिंग रणनीती नसलेल्या बँकांना हातचे ग्राहक गमवावे लागू शकतात, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे. मोबाईल बँकिंगच्या दर्जावरून बँक बदलण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक आहे, असेही यात म्हटले आहे.
मोबाईल बँकिंगचे वापरकर्ते चार वर्षांत दुप्पट होणार
भारत व चीनमध्ये मोबाईल बँकिंगचा वापर झपाट्याने वाढत असल्यामुळे मोबाईलचा बँकिंग व्यवहारासाठी वापर करणाऱ्यांची जगातील संख्या येत्या चार वर्षांत दुप्पट होऊ शकते, असा निष्कर्ष
By admin | Published: August 11, 2015 03:18 AM2015-08-11T03:18:55+5:302015-08-11T03:18:55+5:30