लखनौ : ‘यूपी गुंतवणूकदार शिखर परिषदे’त पहिल्याच दिवशी १,०४५ करार झाले असून, त्याद्वारे उत्तर प्रदेशात ४.२८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.या परिषदेच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांनी शिखर परिषदेत केलेल्या भाषणात आदित्यनाथ म्हणाले की, फॉर्च्युन-५०० कंपन्या शिखर परिषदेत सहभागी झाल्या आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मी नुकताच ४.२८ लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. शिखर परिषदेत झालेल्या १,०४५ सामंजस्य करारांतूनही तेवढीच रक्कम राज्याला मिळणार आहे. आपण नव्या उत्तर प्रदेशच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यासाठी मी स्वत: लक्ष घालीन. राज्यात गुंतवणुकीसाठी येणाºया गुंतवणूकदारांना सर्व सुविधा दिल्या जातील. कायदा व सुव्यवस्था, पायाभूत सोयी, ऊर्जा, रस्ते यांसारख्या सर्व प्राथमिक गरजा पूर्ण केल्या जातील. पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासकीय चौकट निर्माण करण्याची खात्री मी देतो. (वृत्तसंस्था)उत्तर प्रदेशात जिओ आणखी १० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी परिषदेत सांगितले की, तीन वर्षांत ही गुंतवणूक केली जाईल. ४ जी सेवा सुरू करताना जिओने २० हजार कोटींची गुंतवणूक आधीच केली आहे. त्याव्यतिरिक्त ही गुंतवणूक असेल. अदाणीचे ३५ हजार कोटी : अदाणी उद्योग समूह उत्तर प्रदेशात ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अदाणी समूहाचे गौतम अदाणी यांनी शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभात सांगितले की, ऊर्जा, रसद, सौर ऊर्जा, रस्ते आणि कृषी या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास समूह इच्छुक आहे.
उत्तर प्रदेशात ४.२८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, अंबानींचे आणखी १० हजार कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 4:08 AM