प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वेरेल्वेच्या डब्यांमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. काश्मीर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी येत्या महिन्यात दोन नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याचा रेल्वेची योजना आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात काश्मीरमधील बहुतांश भागात तापमान उणेपर्यंत पोहोचते. त्यामुळे याठिकाणी थंडीची मोठी लाट असते.
अशा स्थितीत प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन रेल्वेने नवीन डब्यांची डिझाइन केली आहे. त्यानुसार, स्पिलर डब्यांमध्ये हीटरची व्यवस्था असणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रेल्वे प्रशासन नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान एक ट्रेन चालवण्याचा विचार करत आहे, जी सेंट्रली हीटेड असणार आहे.
म्हणजेच, स्लीपर कोचमध्ये हीटर असणार आहे. ही ट्रेन दिल्ली-श्रीनगर हे अंतर १३ तासांत पूर्ण करेल. पुढील महिन्यात या ट्रेनचे उद्घाटन होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. सेकंड क्लासच्या स्लीपर कोचमध्ये हीटरची सुविधा असणार नाही.
कटरा-बारामुल्ला मार्गासाठीही विशेष ट्रेन
रिपोर्टनुसार एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, दुसरी ट्रेन कटरा-बारामुल्ला मार्गासाठी चेअर सीटिंगसह वंदे भारत सुरु करण्यात येणार आहे. ज्यामध्ये आठ डबे असतील. या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे थंडीपासून बचाव करण्यासाठी पाण्याच्या टाक्यांना सिलिकॉन हीटिंग पॅडची व्यवस्था आहे.
थंडीमुळे, जेव्हा पारा उणे पातळीपर्यंत पोहोचतो, तेव्हा लोको पायलटच्या विंडशील्डवर बर्फ तयार होतो. यासाठी भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच पुढच्या काचेला विशेष एम्बेडेड हीटिंग एलिमेंटसह डिझाइन केले गेले आहे, जेणेकरून पायलट कोच कोणत्याही परिस्थितीत डीफ्रॉस्ट राहू शकेल.
दरम्यान, दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक माता वैष्णोदेवीच्या मंदिराला भेट देतात, जे कटरा रेल्वे स्थानकावर उतरतात. अशा परिस्थितीत प्रवाशांना या नव्या ट्रेनचा मोठा फायदा होणार आहे. सध्या या मार्गावर नवी दिल्लीला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावत आहे.