Vande Bharat Sleeper Train : लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाला आरामदायी बनवण्यासाठी, भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करणार आहे. सेमी हाय-स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वात लग्झरी ट्रेनपैकी एक आहे. अलिकडेच, मुंबई-अहमदाबाद मार्गाच्या ५४० किमी मार्गावर या ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
सरकारने पीआयबीवर दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या १६ कोचच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनने १५ जानेवारीला मुंबई-अहमदाबाद विभागात ५४० किलोमीटर अंतरासाठी रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) कडून कठोर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीने गेल्या वर्षी १७ डिसेंबरला भारतातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनची बांधणी पूर्ण केली आहे. पंधरा दिवसांतच ट्रेन कोटा विभागात आणण्यात आली आणि या ट्रेनच्या ३०-४० किमीच्या छोट्या चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. या काळात, ट्रेनने ताशी १८० किमी वेगाने चांगली कामगिरी केली.
दरम्यान, प्रोटोटाइपच्या यशस्वी चाचणीनंतर, एप्रिल ते डिसेंबर २०२५ दरम्यान आणखी नऊ वंदे भारत स्लीपर ट्रेन सेट तयार करण्याचे नियोजन आहे. या ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी कार्यक्षमता आणि सोयीच्या बाबतीत नवीन मानके स्थापित करतील.
भारतीय रेल्वेने १७ डिसेंबर २०२४ रोजी २४ डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सेटच्या ५० रॅकसाठी प्रोपल्शन इलेक्ट्रिकची मोठी ऑर्डर दिली आहे. ही ऑर्डर दोन आघाडीच्या भारतीय निर्मात्या कंपन्यांना देण्यात आली आहे. ही ऑर्डर २ वर्षांच्या कालावधीत तयार होण्याची अपेक्षा आहे.
देशातील इतर मेल किंवा एक्सप्रेसप्रमाणे, वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील तीन कॅटगरीमध्ये विभागली गेली आहे. यामध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी सेकंड टियर आणि एसी थर्ड टियर आहे. या ट्रेनमध्ये एका वेळी १,१२८ प्रवासी प्रवास करू शकतात. याशिवाय, सुरक्षितता लक्षात घेऊन, क्रॅश बफर, डिफॉर्मेशन ट्यूब आणि फायर बॅरियर वॉल सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
लवकरच २४ कोचची वंदे भारत ट्रेन
रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, २४ कोचच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे पूर्ण प्रमाणात उत्पादन २०२६-२७ मध्ये सुरू होईल, ज्यामुळे रेल्वे तंत्रज्ञानात भारताची आत्मनिर्भरता आणखी मजबूत होईल. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक हाय-टेक फीचर्स जोडण्यात आली आहेत. ऑटोमेटिक गेट्सपासून ते कंफर्टेबल बर्थपर्यंत, ही ट्रेन आरामदायी प्रवासासाठी एक नवीन बेंचमार्क असणार आहे. याशिवाय, प्रत्येक प्रवाशाला प्रवासादरम्यान मोफत वायफायची सुविधा मिळेल, जेणेकरून ते इंटरनेटचा आनंद घेऊ शकतील.