Vande Bharat :भारतात रेल्वेचे जाळे सातत्याने विस्तारत आहे. सरकारने अनेक मार्गांवर आधुनिक वंदे भारत ट्रेन सुरू केल्या आहेत. हळुहळू याची व्याप्ती वाढवली जाणार आहे. पण, आता या वंदे ट्रेनबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. भारतासह आता परदेशातही वंदे ही ट्रेन धावणार आहे. सरकारी कंपनी BEML Ltd ने विश्वास व्यक्त केला आहे की, भविष्यात, संरक्षणाबरोबरच, रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रे देशाच्या महसुलात सर्वात महत्वाचे योगदान देतील. कंपनी येत्या काही वर्षांत वंदे भारत आणि मेट्रो ट्रेनसाठी निर्यात ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.
काय आहे कंपनीची योजना ?
बीईएमएलचे अध्यक्ष शंतनू रॉय यांनी टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, सर्वात आधी स्वदेशी वंदे भारत गाड्या सुरू करणे, हे आमचे प्राधान्य आहे. पण, पुढील वर्षी आम्ही निर्यातीच्या बाबतीत काहीतरी प्रयत्न करणार आहोत. BEML सध्या भारतीय रेल्वेसाठी वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या प्रोटोटाइपची निर्मिती करत आहे, जी येत्या काही महिन्यांत सुरू होण्याची अपेक्षा आहे. BEML ने सांगितल्यानुसार, मेक इन इंडिया उपक्रमाला गती देणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे. पण, ते ते मध्य पूर्व, दक्षिण अमेरिका आणि आसियान प्रदेशात रेल्वे आणि मेट्रो निर्यातीच्या संधी शोधत आहेत.
रॉय पुढे म्हणाले की, बीईएमएलचे अंतिम उद्दिष्ट सध्याच्या 4% वरुन सुमारे 10% पर्यंत निर्यात वाढवणे आहे. वाढ सुव्यवस्थित करण्यासाठी, BEML ने तीन प्रमुख क्षेत्रांवर (खाणकाम-बांधकाम, संरक्षण-रेल्वे आणि मेट्रो) लक्ष केंद्रित करून या आर्थिक वर्षात आपल्या कामकाजाची पुनर्रचना केली आहे. कंपनीने या क्षेत्रांमध्ये 11 स्ट्रॅटेजिक बिझनेस युनिट्स (SBUs) ची स्थापना केली आहे, त्यांपैकी प्रत्येकाचे नेतृत्व एक CEO करेल, ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता अधिक असेल आणि ऑपरेशन्सवर चांगले नियंत्रण असेल.
जून तिमाहीत कंपनीचा नफा
BEML चा एकत्रित निव्वळ तोटा 30 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत रु. 70 कोटी इतका कमी झाला, तर कंपनीने टॉपलाइनमध्ये 10% वाढ साधली. महसुलाबाबत रॉय म्हणाले की, मागील वर्षांच्या तुलनेत कामगिरी खूपच चांगली होती. या वर्षी 13% एबीआयटीडीए वाढीमध्ये 100 बेसिस पॉइंट्सची वाढ साध्य केली आहे. नजीकच्या भविष्यात 16-17% पर्यंत पोहोचण्याचे आमचे लक्ष्य आहे. BEML आपल्या भविष्यातील संभाव्यतेबद्दल आशावादी आहे आणि रेल्वे, मेट्रो आणि संरक्षण क्षेत्रातील आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे.