वेदांताचा फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेल्यावरून महाराष्ट्रात राजकारण सुरु होते. यानंतरही काही प्रकल्प गुजरातला गेले. यावरून शिंदे-भाजपा सरकार आणि ठाकरे गटामध्ये एकमेकांवर आरोप करण्याचे सिलसिले सुरु आहेत. वेदांता प्रकल्प गुजरातला का गेला यावर वेदांता लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दुसऱ्यांदा स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये १.५४ लाख कोटी रुपयांचा प्रकल्प का नेला यावर अग्रवाल यांनी माहिती दिली आहे. अनिल अग्रवाल यांनी शनिवारी झालेल्या एचटी लीडरशिप समिटमध्ये सांगितले की, सल्लागारांचा समावेश असलेल्या एका स्वतंत्र समितीने साइटसाठी चांगले पर्याय शोधण्यासाठी पाच ते सहा राज्यांना भेट दिली होती. यामध्ये त्यांना गुजरात चांगला पर्याय वाटला. येथील वातावरण उत्तम असून युनिटला अधिक चांगल्या सुविधा दिल्या जाणार असल्याचे या सल्लागारांनी सांगितले. यामुळे सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले युनिट गुजरातला नेण्याचे ठरल्याचे अग्रवाल म्हणाले.
सध्या आम्ही सध्या मूलभूत कच्चा माल बनवणार आहोत. विहीर खोदली की सर्वांना पाणी मिळणार. यापेक्षाही मोठा प्लांट महाराष्ट्रात उभारला जाणार आहे. गुजरातमध्ये प्लांट उभारण्यामागे स्वतःची आव्हाने आहेत. गुजरातपेक्षा मोठा असणारा डाउनस्ट्रीम प्रकल्प महाराष्ट्रात उभारला जाणार आहे, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
येत्या दोन वर्षांत गुजरात प्लांटमधून उत्पादन सुरू करण्याची त्यांची योजना असल्याचे अग्रवाल यांनी यापूर्वी गुजरातमधील एका कार्यक्रमात सांगितले होते. वेदांता 945 अब्ज रुपये डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये गुंतविणार आहे. तर चिप मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर स्वतंत्रपणे 600 अब्ज रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यातून १० हजार रोजगार प्राप्त होतील, असा दावा गुजरात सरकारने केला आहे.