Vedanta Group Anil Agarwal: अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांता समूहानं (Vedanta Group) भारतासाठी आपला रोडमॅप तयार केला आहे. समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल (Anil Agarwal) यांनी येत्या चार वर्षांत भारतातील विविध क्षेत्रात सुमारे २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर स्टील व्यवसाय विकण्याचे संकेतही त्यांनी दिले. कंपनीवरील प्रचंड कर्ज हा चिंतेचा विषय मानण्यासही त्यांनी नकार दिला.
अनेक व्यवसायांवर नजर
वेदांता समूह भारतात गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे. आम्ही अनेक क्षेत्रात गुंतवणूक करण्याची योजना आखली असून आमचा चार वर्षांचा गुंतवणुकीचा प्लॅन तयार आहे. सध्या आमचं लक्ष टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि ग्लास व्यवसायावर असल्याचं अनिल अग्रवाल म्हणाले. "स्मार्टफोन आणि लॅपटॉप बनवण्यासाठी सेमीकंडक्टर आणि ग्लासची नितांत गरज आहे. वेदांता समूह या दोन्ही व्यवसायात आधीपासूनच अस्तित्वात आहे. सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी आपल्याकडे गुजरातमध्ये जमीन आहे. सध्या यासाठी योग्य पार्टनरचा शोध घेतला जात आहे.
'... तर स्टील व्यवसायाची विक्री करणार'
"वेदांता समूह तो सुरू ठेवण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहे. मार्चमध्ये त्याची विक्री व्हायला हवी होती. मात्र, योग्य किंमत न मिळाल्यानं निर्णय होऊ शकला नाही. मात्र, स्टील व्यवसायाला योग्य भाव मिळाला तर आम्ही तो विकायला तयार आहोत. योग्य भाव मिळाला नाही तर आम्ही हा व्यवसाय सुरूच ठेवू. स्टील व्यवसाय नफ्यात आहे. त्याचबरोबर तो चालवण्यासाठी आमच्याकडे विश्वासार्ह टीम आहे," असं स्टील व्यवसायाबाबत स्पष्टीकरण देताना अनिल अग्रवाल म्हणाले.
'लोन डिफॉल्ट केलं नाही'
"आमच्यावर १२ अब्ज डॉलर्सचं कर्ज आहे. परंतु याबाबत कोणताही चिंतेचा विषय नाही. वेदांता समूहानं आजवर कधी डिफॉल्ट केलेलं नाही. प्रत्येक व्यवसाय उभा करण्यासाठी कर्जाची गरज पडतेच," असंही त्यांनी नमूद केलं.