Join us  

हॉटेलिंग नको रे बाबा! कांदे, बटाटे, टोमॅटोच्या किमती वाढल्याने व्हेज थाळी महाग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 7:26 AM

रब्बी हंगामातील कांद्याचे क्षेत्र यंदा मोठ्या प्रमाणात घटल्याने कांद्याची आवक घटली.

नवी दिल्ली - भारतात जून २०२४ मध्ये शाकाहारी थाळीची सरासरी किंमत १० टक्के वाढली आहे. कांदे, टोमॅटो आणि बटाटे यांच्या वाढलेल्या किमती हे यामागील मुख्य कारण आहे. ‘क्रिसिल मार्केट इंटेलिजन्स ॲण्ड ॲनालिसिस’ने जारी केलेल्या ‘रोटी राइस रेट’ नावाच्या मासिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. 

शाकाहारी थाळीची किंमत जून २०२४ मध्ये १० टक्के वाढून २९.४ रुपये झाली. जून २०२३ मध्ये ती २६.७ रुपये, तर मे २०२४ मध्ये २७.८ रुपये होती. थाळीत पोळी, भाज्या (कांदे, टोमॅटो आणि बटाटे), भात, डाळ, दही आणि सॅलड यांचा समावेश आहे. एप्रिल २०२४ मध्येही थाळीची किंमत ८ टक्के वाढून २७.४ रुपये झाली. त्यावेळीही दरवाढीचे मुख्य कारण महाग कांदे, बटाटे आणि टोमॅटो हेच होते. एप्रिलमध्ये जिरे, मिरच्या व वनस्पती तेल यांच्या किमती अनुक्रमे ४० टक्के, ३१ टक्के आणि १० टक्के कमी झाल्याने थाळीच्या खर्चाच्या वाढीला थोडा ब्रेक लागला. 

अवकाळी पावसाचा फटका

रब्बी हंगामातील कांद्याचे क्षेत्र यंदा मोठ्या प्रमाणात घटल्याने कांद्याची आवक घटली. अवकाळी पावसामुळे बटाट्याला फटका बसला आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात तापमान वाढीमुळे उत्पन्नाला फटका बसला आहे. भाताचे क्षेत्रही यंदा घटले. त्यामुळे भात उत्पादन १३ टक्के घटले. आवक कमी झाल्यामुळे किमती वाढल्या. यंदा खरीप हंगामात अनेक महिने पावसाने दडी मारल्यामुळे डाळींचे उत्पादन घटून किमती २२ टक्के वाढल्या आहेत. या अहवालानुसार रब्बी हंगामात पश्चिम बंगालमध्ये बटाटा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. कांद्याचे दर तर यंदा सातत्याने वाढत आहेत. कांदा निर्यातीवर निर्बंध शिथिल केल्याने कांदा पुन्हा महागला.