नवी दिल्ली : पॅकेजड फूड प्रॉडक्ट्स हे शाकाहारी आहे की मांसाहारी (व्हेज/नॉनव्हेज) हे दर्शवणारे चिन्ह (डॉट्स) असते, तसेच चिन्ह यापुढे सौंदर्य प्रसाधने आणि फेस वॉश, साबण, शाम्पू आणि टूथपेस्ट आदीच्या पॅकेजिंगवरही असेल. मात्र, ही उत्पादने मांसाहारी की शाकाहारी हे त्यावर तपकिरी/लाल किंवा हिरव्या रंगातील ठिपक्यांवरून सांगता येईल.या बाबतीतील प्रस्ताव नुकताच ड्रग्ज टेक्निकल अॅडव्हायझरी बोर्डने (डीटीएबी) १६ मे, २०१८ रोजी मंजूर केला, असे सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायझेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. डीटीएबी हे देशातील सर्वोच्च औषधी सल्लागार मंडळ आहे. नियोजित बदल समाविष्ट करण्यासाठी ड्रॅग्ज अॅण्ड कॉस्मेटिक्स रुल्स, १९४५मध्ये दुरुस्ती केली जाईल, असे हा अधिकारी म्हणाला.यासंदर्भातील अधिसूचना येत्या सहा महिन्यांत जारी केली जाईल, अशी अपेक्षा आहे. डॅग्ज कंट्रोलर जनरल आॅफ इंडिया डॉ. एस. ईश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार जैन समाजाचे लोक आणि ग्राहक कामकाज विभाग यांनी बºयाच काळापासून सौंदर्य प्रसाधने व फेस वॉश, साबण, शाम्पू आणि टूथपेस्ट आदी उत्पादने शाकाहारी की मांसाहारी आहेत, हे दर्शवणारा तपकिरी, लाल किंवा हिरवा ठिपका त्यांच्या पॅकेजिंगवर बंधनकारक करावा, अशी मागणी केली होती.केवळ खाद्यान्नांवरच सध्या देशात पॅकेजड फूड प्रॉडक्टस हे शाकाहारी की मांसाहारी आहेत हे दर्शवणारा अनुक्रमे हिरवा आणि लाल ठिपका त्याच्या पॅकेजिंगवर असणे बंधनकारक केले गेलेले आहे. मात्र, आता सौंदर्य प्रसाधन वापरणाºयांनाही ती शाकाहारी आहेत की मांसाहारी आहेत, हे सहजपणे समजू शकेल.
सौंदर्य प्रसाधनांवरही व्हेज/नॉनव्हेजचे चिन्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:06 AM