Join us

महागाई नियंत्रणासाठी भाज्या, फळे करमुक्त; न्यूझीलँड सरकारने घेतला धाडसी निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:24 AM

या धाडसी निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

ऑकलँड : जगभरात महागाईचा भडका उडालेला असतानाच न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस हिप्किन्स यांनी जगावेगळा निर्णय घेऊन भाज्या आणि फळे करमुक्त केली आहेत. न्यूझीलंडमध्ये भाज्या आणि फळांच्या किमती तिप्पट महागल्या होत्या. या धाडसी निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. 

सध्या भारतासह संपूर्ण जग महागाईने नागरिक त्रस्त आहेत. न्यूझीलंडमध्ये फळे आणि भाज्यांचे दर तिप्पट वाढल्यामुळे रोजच्या जेवणाची थाळी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेली आहे. टोमॅटोचा भाव प्रतिकिलो १३ ते १७ डाॅलर झाला आहे. कांदेही ५ डॉलर प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. करमुक्तीच्या निर्णयामुळे भाज्यांचे दर १५ टक्के कमी होतील. लोकांच्या क्रयशक्तीत वाढ होईल, तसेच सकळ राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) मोठी वाढ होईल, असे सरकारने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

हा तर स्टंट; विरोधी पक्षांनी केली टीका 

पंतप्रधान हिप्किन्स यांनी फळे आणि भाज्या पूर्णत: करमुक्त करण्याची घोषणा करून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पंतप्रधान हिप्किन्स यांच्या या निर्णयावर विरोधकांनी कठोर टीका केली आहे. विरोधकांनी म्हटले आहे की, आगामी काही महिन्यांत न्यूझीलंडमध्ये राष्ट्रीय पातळीवर निवडणुका होत आहेत. त्यामुळे पंतप्रधान हिप्किन्स यांनी निवडणूक स्टंट करून फळे व भाज्या करमुक्त केल्या आहेत.

 

टॅग्स :न्यूझीलंडफळे