नवी दिल्ली : भारतातून होणारी निर्यात एप्रिल २0१६मध्ये १५.८७ टक्क्यांनी घसरून २.४४ लाख वाहने इतकीच झाली. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेमधील प्रमुख विदेशी बाजारात असलेल्या मंदीमुळे ही निर्यात घटली.सोसायटी आॅफ आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)च्या ताज्या आकड्यानुसार देशी उद्योगाने गेल्या वर्षी याच महिन्यात २.९0 लाख वाहनांची निर्यात केली होती. ‘सियाम’चे महासंचालक विष्णू माथुर यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, एकूणच निर्यात घटली असून, प्रत्येक विभागात घसरण झाली आहे. आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या देशातील बाजारात मोठी आव्हाने असल्याने ही निर्यात घसरली आहे. वस्तूंच्या निर्यातीत घट, कच्च्या तेलाचे कमी भाव यामुळे आफ्रिका देशांच्या बाजारातील उत्पन्न घटले आहे. माथुर म्हणाले की, इकडे लॅटिन अमेरिकेत तेथील चलनाच्या विनिमय दरावर महागाईचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे तेथील लोकांची खरेदीची शक्ती घटली आहे. भारतातून प्रामुख्याने मेक्सिको, अर्जेंटिना, नायजेरिया आणि अल्जिरिया यांसारख्या देशांत वाहनांची निर्यात होते. एप्रिलमध्ये तीनचाकी वाहनांच्या निर्यातीवर सर्वांत वाईट परिणाम झाला. निर्यात तब्बल ६१.८६ टक्के घटली. त्यामुळे केवळ १८,१३५ तीनचाकी वाहनांचीच निर्यात झाली. गेल्या वर्षी याच काळात ४७.५४८ तीनचाकी वाहनांची निर्यात झाली होती.
एप्रिलमध्ये वाहन निर्यात १६ टक्क्यांनी घसरली
By admin | Published: May 16, 2016 4:12 AM