मुंबई - सध्याच्या काळात चारचाकी वाहन ही प्रत्येकाची गरज बनली आहे. उन्हाळा असो वा पावसाळा कारमध्ये बसून लोक सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचू शकतात. त्याचसोबत कार हे रोजगाराचं आणि उद्योगाचं माध्यमही बनलं आहे. त्यामुळे कार खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच बहुतांश लोक कर्ज घेऊन कार खरेदी करतात. कार खरेदीसाठी मोठ्या रक्कमेची गरज असते, जी एकत्रित देणं शक्य होत नाही. त्यामुळे गृहकर्जानंतर वाहन खरेदी कर्ज सर्वाधिक वापरलं जाते.
वाहन कर्ज घेण्याचे फायदे
वाहन कर्जाच्या माध्यमातून तुम्हाला तुमची आयुष्यभराची पुंजी खर्च न करता कार खरेदी करता येऊ शकते. तुम्ही केवळ कारच्या एकूण किंमतीपैकी काही हिस्सा डाऊन पेमेंट म्हणून देत उर्वरित रक्कमेवर कर्ज घेऊ शकता. वाहन कर्जावरील व्याजावर आपल्याला करातूनही सूट मिळते. वाहन कर्ज घेऊन तुम्ही बचत केलेली रक्कम इतर गोष्टीसाठी वापरू शकता. वाहन कर्ज घेत कार खरेदी करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या सुविधेनुसार मासिक हफ्ते भरून कर्ज फेडू शकता.
वाहन कर्ज घेण्याचं नुकसान
जर तुम्ही कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतले तर त्यावर व्याज द्यावे लागते. अशात तुम्हाला वाहन कर्जावरही व्याज द्यावे लागेल त्यामुळे तुमच्या वाहन खरेदीसाठी लागणारा खर्च वाढेल. कर्जावर आणखी कर्ज घेणे तुमची आर्थिक स्थिती बिघडवू शकते. जर तुम्ही कर्जाचे हफ्ते वेळच्यावेळी भरले नाहीत तर बँक तुमची कार जप्त करू शकते. कर्ज घेतल्यानंतर तुम्हाला कारसाठी जास्त विमा भरावा लागतो. कर्जाच्या निर्धारित केलेल्या कालावधीतच हफ्ते द्यावे लागतात.
वाहन कर्ज घेण्याआधी काय काळजी घ्याल?
एकूणच काय, वाहन खरेदी करणं फायद्याचं की तोट्याचं हे तुमच्या जीवनशैलीवर आणि आर्थिक परिस्थितीवर अवलंबून आहे. कर्ज घेण्यापूर्वी तुमचे उत्पन्न, खर्च, कर्ज फेडण्याची क्षमता, व्याजदर याचा अभ्यास करा. जर तुम्ही वाहन कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर विविध बँकांचे व्याज दर आणि त्यांच्या अटी शर्थी तपासूनच जिथे जास्त फायदा होईल तिथून कर्ज घ्या. त्यासोबतच कर्जावर वाहन घेणाऱ्यांनी वाहनाचा मेन्टेन्स, इन्श्युरन्स आणि अन्य खर्चाचाही विचार करावा. वाहन कर्ज घेण्यासाठी गाडीच्या देखभालीसाठी लागणारा खर्च तुम्ही करू शकता का याचा विचार करावा.