लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जूनमध्ये वाहन विक्रीत वाढ झाली आहे. दुचाकीसह चारचाकी वाहनांच्या विक्रीने टॉप गिअर टाकल्याचे दिसून आले.
कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल आणि मेमध्ये वाहनविक्री घटली होती. जूनमध्ये साथ नियंत्रणात आल्यामुळे विक्री वाढली आहे. बजाज ऑटोच्या दुचाकी वाहन विक्रीत वार्षिक आधारावर २२ टक्के वाढ झाली आहे. जून २०२१ मध्ये कंपनीने ३,१०,५७८ वाहने विकली. आदल्या वर्षीच्या जूनमध्ये हा आकडा २,५५,१२२ वाहने इतका होता. यात देशांतर्गत विक्रीतील वाढ ६ टक्के आहे.
कंपनीने देशात १,५५,६४० वाहने विकली. आदल्या वर्षी हा आकडा १,४६,६९५ होता. कंपनीची निर्यात ४३ टक्क्यांनी वाढून १,५४,९३८ वाहनांवर गेली. आदल्या वर्षी हा आकडा १,०८,४२७ होता. एप्रिल-जून २०२१ या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत १२५ टक्के वाढ झाली आहे. एकूण ८,९९,३०५ दुचाकी वाहने कंपनीने विकली.
कार विक्रीतही वाढ
मारुती सुझुकीने जून २०२१ मध्ये १.४७ लाख वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये हा आकडा केवळ ५७,४२८ इतका होता. टाटा मोटर्सच्या विक्रीत १२५ टक्के वाढ झाली. कंपनीची ४३,७०४ वाहने जूनमध्ये विकली गेली. एमजी मोटर्सच्या ३,५५८ कार विकल्या गेल्या. मेमध्ये हा आकडा १,०१६ इतकाच होता.
ट्रॅक्टर विक्री वाढली
जूनमध्ये आघाडीची ट्रक उत्पादक कंपनी अशोक लेलँडची विक्री १६९ टक्क्यांनी वाढून ६,४४८ वाहनांवर गेली. ट्रॅक्टर उत्पादक कंपनी एस्कॉर्टची विक्री १५.५ टक्क्यांनी वाढून १२,५३३ वाहनांवर गेली.