नवी दिल्ली : सणासुदीच्या हंगामामुळे ऑक्टोबरमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीत ११ टक्क्यांची वाढ झाली आहे, अशी माहिती वाहन वितरकांची संघटना ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) दिली आहे. ऑक्टोबरमध्ये २,४८,०३६ प्रवासी वाहने विकली गेली, असे फाडाने म्हटले आहे.
फाडाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०१८ मध्ये २,२३,४९८ प्रवासी वाहने विकली गेली होती. गेल्या महिन्यात दुचाकी वाहनांची विक्री ५ टक्क्यांनी वाढून १३,३४,९४१ वाहनांवर गेली. गेल्या वर्षी हा आकडा १२,७०,२६१ होता. व्यावसायिक वाहनांची विक्री मात्र २३ टक्क्यांनी घटली आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ८७,६१८ व्यावसायिक वाहने विकली गेली होती. यंदा हा आकडा घसरून ६७,०६० वर आला आहे. तीन-चाकी वाहनांची विक्री ४ टक्क्यांनी वाढून ५९,५७३ वाहनांवर गेली.
सर्व श्रेणींतील वाहनांची एकत्रित विक्री ४ टक्क्यांनी वाढून १७,०९,६१० वाहने झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात १६,३८,८३२ वाहने विकली गेली होती. फाडाचे अध्यक्ष आशिष हर्षराज काळे यांनी सांगितले की, ऑक्टोबरमधील किरकोळ विक्री सकारात्मक राहिली. त्यामुळे वाहन उद्योगास आवश्यक असलेला दिलासा मिळाला आहे. विशेषत: वाहन वितरकांसाठी हा महिना चांगला राहिला. विक्रीतील अनेक महिन्यांच्या घसरगुंडीनंतर पहिल्यांदाच वाढ झाली आहे.
बीएस-६ कडे वाटचाल
आशिष काळे यांनी सांगितले की, पुढील वाहन उद्योग अज्ञात अशा बीएस-६ स्थित्यंतरातून जाणार आहे. पुढील वर्षापासून देशात बीएस-६ वाहनेच बाजारात येणार आहेत. त्यामुळे वितरकांचा तोटा न होता सध्याच्या वाहनांचे साठे कसे कमी करता येतील, हे पहावे लागणार आहे.
वाहनांच्या विक्रीत ऑक्टोबरमध्ये वाढ
मोठा दिलासा; साठे कमी करण्यावर भर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 02:03 AM2019-11-20T02:03:49+5:302019-11-20T02:04:03+5:30