नवी दिल्ली : यंदाच्या सणासुदीत वाहन कंपन्यांची विक्रमी विक्री केली. ४२ दिवसांच्या हंगामात ४२.८८ लाख वाहने विकली गेली आहेत. मागच्या वर्षी सणासुदीच्या हंगामात वाहन उद्योगाने ३८.३७ लाख युनिट्सची विक्री केली होती. यंदा विक्रीत ११.७६ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
ग्रामीण भागातून मजबूत मागणीमुळे बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर पोहोचली आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशनने (फाडा) दिली आहे. सुरुवातीच्या काळात बाईक विक्रीत फारसा जोर नव्हता; परंतु नंतर ही मागणी जोरदार वाढल्याचे ‘फाडा’ने स्पष्ट केले. वाहन कंपन्यांनी ग्राहकांना मोठ्या प्रमाणात दिलेल्या सवलती आणि ईएमआय योजनांमुळे विक्रीला गती मिळाली. प्रवासी वाहनांची विक्री ७.१० टक्के वाढून ६.०३ लाख युनिटवर पोहोचली.
‘उच्चांकामुळे समाधान’
- ‘फाडा’चे अध्यक्ष सी. एस. विघ्नेश्वर म्हणाले की, यंदाच्या सणासुदीत झालेल्या विक्रीची आकडेवारी जाहीर करताना मला विशेष आनंद होत आहे. यंदा किरकोळ वाहन विक्रीने मागच्या वर्षीचा विक्रम मोडीत काढत नवा उच्चांक गाठला आहे.
- पायाभूत सुविधांवर सरकारकडून पुरेसा खर्च केल्यास व्यावसायिक वाहनांच्या विक्रीला चालना मिळू शकणार आहे.
कशामुळे बसला फटका?
- यंदा ४५ लाखांहून अधिक युनिटच्या विक्रीचे लक्ष्य समोर ठेवले होते; परंतु दक्षिण भारतातील अवकाळी पावसाचा विक्रीला फटक बसला.
- ओडिशातील चक्रीवादळामुळेही वाहनविक्रीचे उद्दिष्ट गाठला आले नाही. दीड महिन्यात ही तूट भरून काढली जाईल, असे ‘फाडा’ने स्पष्ट केले.