नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात भारतातील वाहन विक्रीने जोरदार उसळी घेेतली असून, कोविड-१९ मुळे निर्माण झालेल्या मंदीचे मळभ दूर होत असल्याचे स्पष्ट संकेत यातून मिळत आहेत. हुंदाई आणि हीरो मोटोकॉर्प या कंपन्यांची घाऊक क्षेत्रातील वाहन विक्री तर सार्वकालिक उच्चांकावर गेली आहे.प्रवासी वाहनांची विक्री मागील दोन वर्षांपासून मंदावलेली आहे. २०१९-२० मध्ये ती १८ टक्क्यांनी घसरली होती. यंदाही ती कमजोरच होती. ऑक्टोबर २०२० मध्ये मात्र विक्रीत जोरदार वाढ झाली आहे. नवरात्र आणि दिवाळीचा जबरदस्त लाभ वाहन क्षेत्राला झाल्याचे दिसून येत आहे.प्रवासी वाहन क्षेत्रात जवळपास ५० टक्के बाजार हिस्सा असलेल्या मारुतीने ऑक्टोबरमध्ये १.६ लाख वाहने विकून १८.९ टक्के वृद्धी मिळविली आहे. मारुतीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सांगितले की, ‘सणासुदीच्या हंगामात आतापर्यंत मागणी जोरात राहिली आहे. तथापि, चालू वित्त वर्षाच्या चौथ्या तिमाहीबाबत तसेच २०२१-२२ बाबत अपेक्षा ठेवताना सावध राहणे आवश्यक आहे.’हुंदाईच्या व्हेन्यू आणि क्रेटा या गाड्यांची जबरदस्त विक्री झाली आहे. कियाची सॉनेट आणि महिंद्राची थर या गाड्याही मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या आहेत. महिंद्राचे सीईओ (वाहन विभाग) विजय नक्रा यांनी सांगितले की, सणासुदीच्या हंगामातील मजबूत विक्रीमुळे वाहन उद्योगास दीर्घकालीन पातळीवर लाभ होईल.
ऑक्टोबरमध्ये हुंदाईने ५६,६०५ वाहने विकली आहेत. हा मासिक विक्रीचा उच्चांक ठरला आहे. कंपनी हीरो मोटोकॉर्पच्या ८ लाखांपेक्षा जास्त गाड्यांची विक्री झाली. १९८३ मध्ये कंपनीची स्थापना झाली तेव्हापासूनची ही सर्वोच्च मासिक वाहन विक्री ठरली आहे. टाटाच्या वाहन विक्रीत ७९ टक्के, तर किया मोटर्सची विक्री ६४ टक्के वाढली आहे.