नवी दिल्ली : सेमी कंडक्टरच्या बाबतीत भारत स्वावलंबी होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केला आहे. ‘सेमीकॉन इंडिया कॉन्फरन्स-२०२२’ मध्ये ते बोलत होते. बंगळुरूमध्ये होत असलेल्या या तीन दिवसीय कॉन्फरन्सचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. कॉन्फरन्सची संकल्पना ‘डिजाईन ॲण्ड मॅन्युफॅक्चर इन इंडिया, फॉर द वर्ल्ड : मेकिंग इंडिया अ सेमीकंडक्टर नेशन’ अशी आहे. सेमी कंडक्टरच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याने वाहनांचे वेटिंग संपणार आहे.
भारताला सेमी कंडक्टरच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी केंद्र सरकारने ७६ हजार कोटी रुपयांची योजना चार महिन्यांपूर्वीच मंजूर केली आहे. मोदींनी सांगितले की, १.३ अब्ज भारतीयांना डिजिटल करण्यासाठी आम्ही पायाभूत सुविधा निर्माण करत आहोत. आम्ही सहा लाख गावांना ब्रॉडबँडने जोडत आहोत, ५-जी, आयओटीमध्ये गुंतवणूक करत आहोत. आमच्याकडे जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी स्टार्टअप इको-सिस्टीम आहे. २०३० पर्यंत भारतातील सेमी कंडक्टरची मागणी ११० अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. व्यापार सुलभ करताना आम्ही २५ हजारपेक्षा अधिक अनुपालन संपवले आहेत. आमच्याकडे जगातील २० टक्के सेमी कंडक्टर डिझाईन इंजिनिअर बनविण्याचा ‘टॅलेंट पूल’ आहे.
सेमी कंडक्टरच्या टंचाईमुळे हीरो इलेक्ट्रिकचे वितरण शून्यावर
सेमी कंडक्टरच्या टंचाईमुळे इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी हीरो इलेक्ट्रिकचे उत्पादन ठप्प झाले आहे. त्यामुळे कंपनी एप्रिलमध्ये एकही गाडी आपल्या डिलरांना पाठवू शकलेली नाही. कंपनीने एक अधिकृत निवेदन जारी करून शुक्रवारी ही माहिती दिली. सध्या आमच्या गाड्यांसाठी ६० दिवसांची प्रतीक्षा यादी आहे, असे कंपनीचे सीईओ सोहिंदर गिल यांनी म्हटले आहे.
पुढील ६ ते ८ महिन्यांत उत्पादन सुरू
सेमी कंडक्टरच्या निर्मतीसाठी केंद्र सरकार पुढील ६ ते ८ महिन्यांत परवानगी देण्याची शक्यता आहे. सेमी कंडक्टर निर्मितीसाठी ५ कंपन्यांनी सरकारकडे अर्ज केले असून, १.५३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सरकारने मंजुरी दिल्यास देशातील सेमी कंडक्टरची कमतरता दूर होणार आहे.
सेमी कंडक्टर का महत्त्वाचे?
सेमी कंडक्टर का महत्त्वाचे? सेमी कंडक्टर हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये एक आवश्यक घटक आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनचा प्रवाह नियंत्रित केला जातो. याचा वापर संगणन, आरोग्य सेवा, लष्करी प्रणाली, वाहतूक, स्वच्छ ऊर्जा आणि इतर असंख्य गोष्टी वापरतात.
सेमी कंडक्टर तयार करणारे प्रमुख देश
चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर, मलेशिया, अमेरिका, जपान, जर्मनी, फिलीपिन्स, थायलंड.
वापर कुठे?
वाहन, मोबाइल फोन, स्मार्टफोन, डिजिटल कॅमेरा, दूरचित्रवाणी, वॉशिंग मशीन, फ्रिज, एलईडी बल्ब
या कंपन्या तयार
वेदांता फॉक्सकॉन जेव्ही, आयजीएसएस व्हेंचर्स, आयएसएमसी, टर्मिनस सर्किट, ट्रायस्पेस, टेक्नो