देशाच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाने १३ तिमाहींमधील नीचांक गाठल्यानंतर, जाहीर झालेल्या अन्य काही आकडेवारींनी बाजाराची काळजी कमी झाली आणि सप्ताहाच्या अखेरीस बाजार वाढीव पातळीवर बंद झाला. आॅगस्ट महिन्यात झालेली जोरदार वाहनविक्री आणि परचेस मॅनेजर्स इंडेक्समध्ये झालेल्या वाढीमुळेच गुंतवणूकदारांनी घसरलेल्या उत्पादनाकडे दुर्लक्ष केलेले दिसते. पाचव्या सप्ताहात निर्देशांक वाढले.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताहात तसे तेजीचेच वारे वाहताना दिसून आले. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक हा सलग पाचव्या सप्ताहात वाढीव पातळीवर बंद झाला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ३१८९२.२३ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये २९६.१७ अंशांनी वाढून बंद झाला. सप्ताहामध्ये झालेल्या या वाढीमुळे बाजार पुन्हा ८ आॅगस्टच्या पातळीवर आला आहे.
राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) दहा हजार अंशांच्या जवळ पोहोचला आहे. गतसप्ताहामध्ये ९९८३.४५ ते ९९०९.८५ या दरम्यान घुटमळणारा हा निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस ११०.१५ अंशांची वाढ नोंदवित, ९९७४.४० अंशांवर स्थिरावला. परकीय वित्तसंस्था विक्री करीत असल्या, तरी देशी वित्तसंस्था, परस्पर निधी आणि गुंतवणूकदार खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर असल्याने बाजार तेजीत राहिला.
आॅगस्ट महिन्यामध्ये देशातील वाहन बाजार तेजीत राहिला. मारुती सुझुकीच्या नेतृत्वाखाली सर्वच आस्थापनांच्या वाहनांची जोरदार विक्री झाली.
यामुळे बाजारातही वाहन उत्पादक आस्थापनांच्या समभागांना वाढती मागणी दिसून आली. आॅगस्ट महिन्याचा पीएमआय हा ४७.९ वरून ५१.२ एवढा वाढला. जीएसटी लागू झाल्यानंतर उत्पादन क्षेत्रामध्ये चांगली वाढ झाल्याचा हा परिणाम आहे.
एकूण देशांतर्गत उत्पादनामध्ये झालेली घट ही बाजाराला खाली आणू शकत होती. मात्र, सकारात्मक बाबींमुळे बाजाराच्या घसरणीला ब्रेक लागत वाढ दिसून आली.
-प्रसाद गो. जोशी