नवी दिल्ली : नियमभंगाचा ठपका ठेवून आयबीआयने केलेल्या कारवाईमुळे पेटीएम पेमेंट बँकेपुढील अडचणी वाढत आहेत. विश्वास उडाल्याने देशभरातील ४२ टक्के किराणा विक्रेत्यांनी हे ॲप वापरणे सोडून दिले आहे. आणखी २० टक्के विक्रेते ॲप सोडण्याच्या विचारात आहेत. देशात एकूण १८ लाख किराणा विक्रेते आहेत.
ग्राहकोपयोगी वस्तूंची सर्वाधिक तीन चतुर्थांश इतकी विक्री किराणा दुकानांतून केली जाते. कोरोना महामारीच्या काळात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंट करण्यावर भर दिला होता.
अधिक पसंती ‘फोनपे’ला
पेटीएम सोडलेल्या निम्म्याहून अधिक विक्रेत्यांनी ‘फोनपे’ची निवड केली आहे. त्यातील ३० टक्के ‘गुगल पे’, तर १० टक्के ‘भारतपे’ ॲपकडे वळले. पेटीएम सोडल्याने या विक्रेत्यांच्या रोजच्या व्यवहारावर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. आरबीआयने लादलेल्या निर्बंधांनंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण झाल्याचे दिसत आहे.