Join us  

एका क्षणात घरबसल्या लखपती लोक बनले कंगाल; नोटा बदलल्यानं १० लाखाची किंमत झाली १ रुपया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 12:54 PM

विचार करा, आपल्या खिशात १० लाख रुपये असतील त्याचं मूल्य केवळ १ रुपया झालं तर?

ठळक मुद्देआर्थिक तंगीमुळे त्रस्त झालेल्या व्हेनेजुएला सरकारने देशाची करेन्सी बदलण्याची घोषणा केली आहेवाढत्या महागाईमुळे दक्षिण अमेरिकेतील देश व्हेनेजुएला(Venezuela) ने नवीन मुद्रा १ ऑक्टोबरपासून लागू करण्याचं घोषित केले सध्याच्या वर्तमान काळातील १० लाख बोलीवरची किंमत आता १ बोलीवर इतकी होणार आहे.

आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ५०० आणि १ हजाराच्या नोटा असणाऱ्यांच्या मनात किती धडकी बसली होती. अचानक एका रात्रीत ५०० आणि हजारांच्या नोटा चलनातून बंद झाल्या होत्या. तेव्हा भारतीयांची मनस्थिती कशी असेल याची सर्वानांच कल्पना आहे. असाच काहीसा प्रकार व्हेनेजुएला इथं घडला आहे.

विचार करा, आपल्या खिशात १० लाख रुपये असतील त्याचं मूल्य केवळ १ रुपया झालं तर? ही परिस्थिती आहे व्हेनेजुएलामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची. आर्थिक तंगीमुळे त्रस्त झालेल्या सरकारने देशाची करेन्सी बदलण्याची घोषणा केली आहे. स्थानिक मुद्रा १० लाख आता १ बोलीवर(Bolivar) करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या महागाईमुळे दक्षिण अमेरिकेतील देश व्हेनेजुएला(Venezuela) ने नवीन मुद्रा १ ऑक्टोबरपासून लागू करण्याचं घोषित केले आहे.

सध्याच्या वर्तमान काळातील १० लाख बोलीवरची किंमत आता १ बोलीवर इतकी होणार आहे. त्यासाठी व्हेनेजुएला डिजिटल कॉइन रिजर्वच्या आधारावर एक क्रिप्टोकरेन्सी क्रांतीच्या माध्यमातून अवस्था सर्वसामान्य बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही डिजिटल मुद्रा मार्च २०२० पासून चलनात आहे. १० लाख बोलीवर नोटा संपवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मंत्री फ्रेडी नानेज यांनी ट्विट करत म्हटलंय की, देशातील सेंट्रल बँक ५, १०, २०, ५० आणि १०० बोलीवर मूल्य आणि १ बोलीवर सिक्क्यासह नवीन नोटा जारी करेल. नवीन व्यवस्थेनुसार १०० बोलीवर सर्वात मोठी नोट असेल. त्याची किंमत वर्तमान काळात १० कोटी बोलीवर इतकी आहे.

सलग ६ व्या वर्षी व्हेनेजुएलामध्ये आर्थिक मंदी आली आहे. खाद्य वस्तू महागल्याने लोकांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. लोकं गरीब होत चालले आहेत. अमेरिकी डॉलरच्या वाढत्या मुल्याने याठिकाणी खाण्याच्या वस्तूचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे लाखो लोक गरीबीच्या रेषेखाली आले आहेत. मागील काळात सरकारने दोन बदल केले होते. त्यामुळे व्हेनेजुएला सरकारने आताही केलेल्या बदलावर लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. २००८ मध्ये राष्ट्रपती हूगो चावेज यांनी बोलीवर नोटावर तीन झिरो काढण्याचा निर्णय घेतला होता. तर त्यांचे उत्तराधिकारी निकोलस मदुरो यांनी २०१८ मध्ये ५ झिरो असलेल्या नोटा हटवल्या होत्या. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सरकारच्या या निर्णयानंतर बाजारातून १० लाख बोलीवरची किंमत घटली आहे. वाढत्या महागाईमुळे ५ लीटर पाण्याची बॉटल खरेदी करण्यासाठी ७४ लाख रुपये मोजावे लागत होते. जे १.८४ डॉलर होते. या स्थितीमुळे व्हेनेजुएलाची अवस्था काय झाली असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो.