नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा काेचर यांनी त्यांच्या पतीच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास व्हिडिओकाॅनचे अध्यक्ष वेणुगाेपाल धूत यांना सांगितल्याची माहिती समाेर आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या आराेपपत्रातून हा खुलासा झाला आहे.
चंदा काेचर यांचे पती दीपक यांच्या मालकीच्या न्यूपाॅवर रिन्युएबल प्रा. लि. या कंपनीत वेणुगाेपाल धूत यांनी ६४ काेटी रुपयांची गुंतवणूक केली हाेती. ईडीने दाखल केलेल्या आराेपपत्रात म्हटले आहे की, चंदा काेचर यांनी त्यांच्या पतीच्या कंपनीत गुंतवणूक करून काळजी घेण्यास धूत यांना सांगितले हाेते. कर्जाचे ३०० काेटी मिळताच ६४ काेटी रुपये पॅसिफिक कॅपिटलकडे वळविल्याचे धूत यांनी सांगितल्याचे ईडीने म्हटले आहे. बँकेने व्हिडिओकाॅनला एकूण ५३९३ काेटी रुपयांचे कर्ज मंजूर केले हाेते. त्यापैकी २८१२ काेटींचे कर्ज बुडीत खात्यात जमा झाले आहे.
चहावाल्याला बनविले संचालक
दीपक यांच्या मालकीच्या पॅसिफिक कॅपिटल फायनान्शियल प्रा. लि. या कंपनीतही एका ऑफिस बाॅयला संचालक म्हणून दाखविण्यात आले हाेते. शरद म्हात्रे असे त्याचे नाव असून दीपक त्याच्याकडून अनेकदा कागदपत्रांवर सह्या घ्यायचे, असा जबाब त्याने ईडीकडे नाेंदविल्याचे आराेपपत्रात म्हटले आहे. या कंपनीतील अनेक संचालक काेचर यांचे नातेवाईक किंवा सामान्य कर्मचारी हाेते.