- पी. व्ही. सुब्रमण्यम, (आर्थिक सल्लागार)
कर्ज काढायची हौस कुणालाच नसते, तरी अनेक जण कर्ज काढतात. सतत प्रश्न विचारतात, कर्ज काढू का? अमूक कर्ज आहे ते आधी फेडू की गुंतवणूक करू, असेही प्रश्न पडतात. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कशासाठी कर्ज काढताय यावर अवलंबून आहे. एका तरुण मित्रानं महागडे व्याजदर असताना २५,००० रुपये कर्ज काढलं, का? - कारण त्याला टॅटू करून घ्यायचाच होता. तो म्हणाला तुम्हाला नसेल वाटत हे कर्ज गरजेचं, मला गरजेचं आहे. त्यामुळे गरज ही फार सापेक्ष गोष्ट झाली.
त्यामुळे ‘कर्ज काढू का?’- यापेक्षा कर्ज कशासाठी काढायचं? ते आवश्यक की जीवनशैली, प्रतिष्ठा या गटात टाकायचं? तो खर्च अकस्मित की नियोजन केलं असतं तर कर्ज टाळता आलं असतं? - हे प्रश्न स्वत:ला विचारावेत.
कर्ज घेण्याचा विचार ‘गरज की जीवनशैलीसाठीचा खर्च?’- या कसोटीवर घासून पाहावा.
१. गाडी दुरुस्त करण्यासाठी कर्ज का?
मुळात गाडीचा विमा का नव्हता काढलेला? गाडी दुरुस्तीवाचून काही पर्यायच नसेल तर कर्ज काढावंच लागेल. ते फेडताना विमा काढण्याचं विसरू नका.
२. फर्निचरसाठी कर्ज :
फर्निचर ही खरंच तातडीची गरज आहे का? ज्यासाठी पर्सनल लोनवर महागडे व्याज भरावे? घर हे गरजेचे; पण फर्निचर? अनेकदा गरजेचे नसताना केवळ हौस म्हणून हा खर्च केला जातो. ही हौस आपल्याला परवडणारी आहे का, याचा विचार फर्निचरसाठी पर्सनल लोन घेताना करावा.
३. मित्रांकडून घेतलेले पैसे फेडायला कर्ज
मुळात मित्रांकडून पैसे घेतले ते कशावर खर्च केले? नाइलाज होणार असेल तर पर्सनल लोन काढून त्यांचे पैसे फेडावेच लागतील. मात्र, ते पैसे आपण का आणि कशावर खर्च केले, याचं उत्तर माहीत हवं.
४. प्लाझ्मा टीव्ही, फॉरिन टुअर, फॅमिली ट्रीप, साड्या, गाड्या हे सारे हप्त्यावर मिळते म्हणून तुम्ही कर्ज काढून ते विकत घेणार?
५. लग्न, मुलांचा वाढदिवस, नातेवाइकांच्या मृत्यूनंतरची कार्ये यासाठी कर्ज काढणार का? तो खर्च नक्की कुणाला दाखवण्यासाठी करणार?
असे प्रश्न असा मांडून पाहा. पर्सनल लोन घेणं आणि ते किती काळात आपल्याला फेडता येईल हे ठरवणं, ही फार जोखमीची गोष्ट आहे. ती जोखीम तुम्ही कशासाठी घेणार नीट विचार महत्त्वाचा!