कर्जाच्या संकटाचा सामना करणारे फ्युचर ग्रुपचे प्रमोटर किशोर बियाणी यांनी आपला मॉल विकून मोठी थकबाकी भरली आहे. माहितीनुसार, फ्युचर ग्रुपनं ४७६ कोटी रुपयांची वन-टाइम सेटलमेंट केली आहे. याद्वारे फ्युचर ग्रुपनं बन्सी मॉल मॅनेजमेंट कंपनीच्या कर्जदारांना ५७१ कोटी रुपयांची थकबाकी भरली आहे, जी कर्जदारांची ८३ टक्के वसुली आहे.
सोमवारी झाली डील
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, के रहेजा कॉर्पनं सोमवारी हा करार केला आहे. त्यासाठी २८.५६ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आलं आहे. माहितीनुसार, के रहेजा कॉर्पनं बँकांना थेट पेमेंट केलं, ज्याच्या बदल्यात मॉल कंपनीला हस्तांतरित करण्यात आला. या कराराला रियल्टी डेव्हलपर के रहेजा कॉर्पोरेशनचा पाठिंबा आहे. के रहेजा कॉर्पने एसओबीओ सेंट्रल मॉल विकत घेतला होता.
के रहेजा यांची समूहातील कंपनी के रहेजा कॉर्प रिअल इस्टेटनं सुमारे १५०,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेला मॉल विकत घेतला आहे. एसओबीओ सेंट्रल हा देशातील पहिला मॉल आहे, जो १९९० च्या अखेरिस दक्षिण मुंबईतील हाजी अली परिसरात उघडण्यात आला होता.
बँकांसाठी मोठं यश
फ्युचर ग्रुपची वसुली हे बँकांसाठी मोठं यश आहे ज्यांना यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये तोटा सहन करावा लागला होता. प्रमुख फ्युचर रिटेच्या रुपात बँकांना फ्युचर समूहाकडून ३३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिकचं नुकसान झालं आहे. समूहाची कंपनी फ्यूचर एंटरप्रायझेस दुसऱ्या रिझोल्यूशन प्रक्रियेतून जात आहे. पहिल्या रिझोल्यूशन प्रक्रियेत कंपनीला खरेदीदार मिळाला नाही.