Join us  

जिओ, एअरटेला टक्कर देण्यासाठी Vodafone Idea चा मोठा निर्णय; दिल्ली-मुंबईत सुरू होणार नवीन सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 3:24 PM

Vodafone Idea : व्होडाफोन आयडिया पुन्हा एकदा मोबाईल नेटवर्क क्षेत्रात नव्या दमाने काम करणार असल्याचे दिसत आहे. कंपनी लवकरच 5जी सेवा सुरू करणार असल्याची माहिती मुख्य तांत्रिक अधिकाऱ्याने दिली.

Vodafone Idea : मोबाईल नेटवर्क क्षेत्रात जिओच्या एन्ट्रीनंतर डझनभर कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. आता हातावर मोजण्याइतक्याच कंपन्या बाजारात आहेत. गेल्या काही दिवसांपासून व्होडाफोन आयडियाने (Vi) पुन्हा एकदा मार्केटमध्ये नव्या दमाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हीआयने इक्विटी फंडिंगद्वारे मार्च २०२५ पर्यंत नेक्स्ट जनरेशन (5G) व्यावसायिक सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जगबीर सिंग म्हणाले की, कंपनी पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि मुंबईमध्ये सेवा सुरू करणार आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत भारतातील किमान ९०% लोकसंख्येपर्यंत 4G कव्हर करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

व्हीआयने त्यांच्या पुनरुज्जीवन योजनेचा भाग म्हणून २४,००० हजार कोटींचा निधी उभारला आहे, ज्यापैकी १८,००० कोटी फॉलो-ऑन सार्वजनिक ऑफरमधून आले आहेत. यातील बहुतेक निधी 4G कव्हर मजबूत करण्यासाठी आणि 5G सेवा सुरू करण्यासाठी वापरला जाणार असल्याचे कंपनीने सांगितले. व्हीआयच्या या निर्णयामुळे रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या कंपन्यांना आव्हान मिळणार आहे.

सिंग म्हणाले की, सध्या सुमारे १.०३ अब्ज लोक 4G कव्हरखाली आहेत, जे सुमारे ७७% आहे. हा आकडा ९०% पर्यंत वाढवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. पुढील वर्षी जूनपर्यंत हे लक्ष्य गाठता येईल. नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर सोडून जाणाऱ्या ग्राहकांना थांबवण्यात कंपनी यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्होडाफोन आयडीयाच्या स्पर्धकांनी ऑक्टोबर २०२२ मध्येच 5G सेवा सुरू केली होती. सिंग म्हणाले की यूकेचा व्होडाफोन समूह आणि भारताचा आदित्य बिर्ला समूह यांच्यातील हा संयुक्त उपक्रम १७ परवानाधारक क्षेत्रांमध्ये 4G आणि 5G सेवांवर लक्ष केंद्रित करेल.

भारत सरकारने गेल्या वर्षी व्होडाफोन आयडियाचे कर्ज इक्विटीमध्ये रूपांतरित केले. ३३.५% स्टेकसह ते सर्वात मोठे शेअरहोल्डर बनले आहे. व्होडाफोन आयडियाचा 5G मध्ये प्रवेश भारतीय दूरसंचार क्षेत्रात एक मोठं पाऊल असणर आहे. अलीकडेच सरकारी कंपनी बीएसएनएलनेही 5जी सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बाजारात चांगलीच स्पर्धा निर्माण होणार आहे.

टॅग्स :व्होडाफोन आयडिया (व्ही)जिओएअरटेल