अकोला : विविध कंपन्यांचे बियाणे बोगस निघत असल्याने शुद्ध बीजोत्पादन कार्यक्रमावर भर दिला जात असून, विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील पंधरा गावात बीजोत्पादनाचा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यास सुरुवात झाली आहे. याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून, एका प्रशिक्षणावर ७५ हजार रुपये खर्च करण्यात येत आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात या प्रशिक्षण प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी स्वत: उच्चप्रतीचे शुद्ध बियाणे निर्माण करण्यासाठी मागील वर्षी राष्ट्रीय कृषी विकास (आरकेव्हीवाय) प्रकल्पांतर्गत या कृषी विद्यापीठाला अनुदान प्राप्त झाले होते.या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील बीजोत्पादनासाठी प्रत्येकी पाच प्रशिक्षण वर्गाचे नियोजन करण्यात आले असून, खरिपातील पाच प्रशिक्षण वर्ग पूर्ण झाले आहेत. एका प्रशिक्षण वर्गात ४० शेतकऱ्यांना बीजोत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतावर विविध पिकांचे बीजोेत्पादन करण्यास सुरुवात केली आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील बालखेड येथील शेतकऱ्यांनी विज्ञान मंडळ स्थापन केले असून, या मंडळाचे अध्यक्ष संतोेष अवताडे, सचिव राजेश गायकवाड तसेच विलास गायकवाड, मदनराव ढोले, राजेश खंडारे यांच्यासह १२० शेतकऱ्यांनी या संबंधीचे प्रशिक्षण घेतले असून, हे सर्व शेतकरी या भागातील शेतकऱ्यांना शुद्ध बीजोत्पादन निर्मितीसाठी प्रोत्साहन देतआहेत.आजमितीस त्यांनी या भागातील पंधरा गावात बीजोत्पादनासाठी शेतकऱ्यांना तयार केले असून, त्या संबंधीचा कार्यक्रम आखला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला आरकेव्हीवायच्या या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अनुदान प्राप्त झाल्याने कृषी विद्यापीठाने १० शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे नियोजन केले आहे. पाच प्रशिक्षण वर्ग झाले असून, त्याचे चांगले फलित समोेर येतआहे.
विदर्भात पंधरा गावांत बीजोत्पादन!
By admin | Published: September 29, 2015 10:52 PM