नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत समस्त दिल्लीकरांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महत्तेची ओळख व्हावी. राज्यातले छोटे उद्योजक तसेच हस्तशिल्प क्षेत्रातील कारागिरांना व लोककलावंतांना आपल्या कलेचे प्रदर्शन करता यावे, या हेतूने राजधानीतल्या दिल्ली हाट या महत्वपूर्ण व्यापार व पर्यटन केंद्रात, १७ ते ३१ जानेवारीदरम्यान ‘महा जत्रा’या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दिल्ली हाट येथे विविध राज्यांच्या हस्तशिल्प कलांची दालने तशी वर्षभर खुली असतात तथापि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक तसेच हस्तशिल्प क्षेत्रातल्या विविध कलाकारांसाठी दिल्ली हाटचा संपूर्ण परिसर व्यापून टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. जानेवारी महिन्यात दिल्लीत देशभरातले पर्यटक मोठ्या संख्येने येतात, त्याचाही लाभ या महा जत्रेत सहभागी होणाऱ्या कारागिरांना मिळेल.महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, मराठी चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळांच्या संयुक्त सहभागाने सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने दिल्लीत महा जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई त्यासाठी दिल्ली हाट परिसराची सजावट करीत आहेत. १७ ते ३१ जानेवारीदरम्यान चालणाऱ्या या जत्रेत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे दर्शन घडवण्यासाठी लोककला क्षेत्रातल्या ८0 कलाकारांचे पथक दाखल होत आहे. महाराष्ट्राच्या हस्तशिल्प कलेचे प्रदर्शन आणि विक्री या जत्रेत होणार असल्याने राज्यातल्या विविध भागातले कारागीरही त्यात सामील होत आहेत.पुरातन काळापासून राष्ट्रीय व ऐतिहासिक घडामोडींच्या इतिहासात महाराष्ट्राचा सहभाग मोठा आहे. हा ऐतिहासिक वारसा कथन करणाऱ्या वस्तू व दुर्मिळ दस्तऐवजांचे प्रदर्शन हे देखील या जत्रेचे खास वैशिष्ठय आहे. (विशेष प्रतिनिधी)सांस्कृतिक कलांची ओळख करूनदेणाऱ्या खास कार्यशाळामहा जत्रेच्या या अभिनव महोत्सवात दिल्लीकर रसिक व पर्यटकांना महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक जीवनाची ओळख करून देणाऱ्या कार्यशाळा, प्रथमच बघायला मिळणार आहेत. महाराष्ट्राची खास ओळख सांगणारी पारंपरिक वारली चित्रकला, रांगोळी, आदिवासी मुखवटे, मातीचे किल्ले तयार करणे, या बरोबरच नऊ वारी साडी नेसणे, इत्यादी गोष्टींचा कार्यशाळा उपक्रमात समावेश आहे. राज्यातला हातमाग उद्योग, रेशीम उद्योग यांच्या वस्त्र परिधानांच्या स्टॉल्ससह महाराष्ट्रातली पर्यटन स्थळे, हस्तशिल्पाच्या लघुउद्योगांचे स्टॉल्स, राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या हिंदी, इंग्रजी पुस्तकांच्या विक्रीसाठी एक स्वतंत्र स्टॉल या जत्रेत पहायला मिळेल.
दिल्ली हाट येथे महाराष्ट्राच्या महत्तेचे दर्शन
By admin | Published: January 15, 2016 2:40 AM