भारतीय बँकांचे हजारो कोटी बुडवून लंडनमध्ये पसार झालेल्या किंगफिशरचा मालक विजय मल्ल्याच्या 'किंगफिशर हाऊस'ची अखेर विक्री झाली आहे. विजय मल्ल्याची मालकी असलेल्या आणि सध्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्सचं मुख्यालय 'किंगफिशर हाऊस' अखेर विकण्यात आलं आहे. कर्जदात्यांनी किंगफिशर हाऊसची हैदराबादस्थित एका खासगी डेव्हलपरला ५२ कोटींना विकलं आहे. याआधीही किंगफिशर हाऊसची विक्री करण्याचे खूप प्रयत्न झाले पण त्यास खरेदीदार मिळत नव्हता. (Vijay Mallya Kingfisher House sold for Rs 52 crore)
रिअल इस्टेट इंडस्ट्रीजच्या तज्ज्ञांच्या हवाल्यानं आलेल्या माहितीनुसार सुरुवातीला बँकांनी या प्रॉपर्टीची रिझर्व्ह किंमत निश्चित केली होती. कारण प्रॉपर्टीच्या विक्रीबाबत काही बंधनं होती. यात प्रॉपर्टीतून भविष्यात काही मिळकत मिळण्याची अपेक्षा नाही कारण संबंधित जागा मुंबई विमानतळाच्या बाहेरील बाजूला आहे. मुंबई विमानतळाजवळच विलेपार्ले येथे किंगफिशर हाऊस आहे.
कर्जदात्यांनी २०१६ साली पहिल्यांदा किंगफिशर हाऊसची १५० कोटींच्या रिझर्व्ह प्राइजसह विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात यश आलं नाही. त्यानंतरही अनेक प्रयत्न केले गेले. मल्ल्याला याआधीच दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तर किंगफिशर एअरलाइन्स २०१२ सालीच बंद करण्यात आली होती.