नवी दिल्ली : हजाराे काेटींचे कर्ज बुडवून लंडनला पळालेला उद्याेगपती विजय मल्ल्याने बॅंकांच्या कर्जवसुलीवरून उपहासात्मक ट्वीट केले आहे. पूर्ण कर्जवसुली केल्यानंतरही बॅंका अजूनही थकीत कर्ज असल्याचे म्हणतात, असे ट्वीट मल्ल्याने केले आहे. ‘आयडीबीआय’ बॅंकेने विजय माल्याला दिलेल्या संपूर्ण कर्जाची वसुली केल्याचे वृत्त प्रकाशित झाले हाेते. बॅंकेने ७.५ हजार काेटी रुपयांचे कर्ज वसूल केले आहे. या वृत्ताचे छायाचित्र जाेडून माल्याने हे ट्वीट केले आहे. ताे म्हणताे, बॅंका तरीही म्हणतात, माझ्याकडे अजून थकबाकी आहे.ब्रिटनमधील न्यायालयाने माल्याला दिवाळखाेर घाेषित केले आहे. त्यामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वातील बॅंक समूहाला आता माल्याच्या परदेशातील मालमत्ता जप्त करून कर्ज वसुली करता येईल. यावरूनच माल्याने उपहासात्मक टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी माल्याने या आशयाचे ट्वीट केले हाेते. ‘ईडी’ने ६.२ हजार काेटींच्या कर्जवसुलीसाठी १४ हजार काेटींची मालमत्ता जप्त केली आहे. तरीही बॅंका मला दिवाळखाेर घाेषित करण्याची मागणी न्यायालयाकडे करतात, हे अद्भुत आहे, असे माल्याने या ट्वीटमध्ये म्हटले हाेते. गेल्या दाेन महिन्यांमध्ये बॅंकांनी माल्याचे शेअर्स विकून सुमारे ९ हजार काेटी रुपयांची कर्जवसुली केली आहे.विजय माल्या २०१६ पासून ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे. किंगफिशर एअरलाईन्सला दिलेले ९ हजार काेटी रुपयांचे कर्ज बुडवून ताे पळाल्याचा ठपका माल्यावर ठेवला आहे. त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग ब्रिटनमधील एका गाेपनीय प्रकरणामुळे थांबलेला आहे.
मल्ल्याने उडविली बॅंकांची खिल्ली, रक्कम परत करूनही बॅंका म्हणतात बाकीच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 9:03 AM