SEBI bans Vijay Mallya: बाजार नियामक संस्था सेबीनं (SEBI) देशातून पळून गेलेल्या उद्योजक विजय मल्ल्यावर कठोर कारवाई केली आहे. सेबीनं विजय माल्ल्यावर चुकीच्या पद्धतीनं व्यवहार केल्यामुळे ३ वर्षांची बंदी घातली आहे. विदेशी संस्था आणि बँकांद्वारे बेकायदेशीरपणे व्यवहार करून कंपन्यांच्या किंमती वाढवल्या आणि त्यातून नफा मिळवल्याचा आरोप सेबीनं केलाय.
शेअर, म्युच्युअल फंड केले फ्रीज
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सेबीनं बंदी घालण्याबरोबरच विजय माल्ल्याचा भारतातील शेअर्स आणि म्युच्युअल फंडातील हिस्सा गोठवला आहे. याशिवाय तो यापुढे कोणत्याही लिस्टेड भारतीय कंपनीचे संचालक म्हणून रुजू होऊ शकणार नाही. सेबीनं यावरही बंदी घातली आहे.
काय आहे प्रकरण?
विजय माल्ल्यानं नोंदणीकृत संस्थांमार्फत आपलं नाव आणि ओळख लपवून परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा गैरवापर केल्याचं सेबीच्या चौकशीत आढळलं होतं. जानेवारी २००६ ते डिसेंबर २००८ या कालावधीत माल्ल्यानं फसवणुकीच्या व्यवहारातून ५७ लाख डॉलर्सची कमाई केल्याचे सेबीच्या तपासात दिसून आलंय.
सेबीच्या नियमांनुसार, एफआयआयद्वारे केवळ भारताबाहेर राहणारेच भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करू शकतात. विजय माल्ल्याने हा नियम मोडला आहे.
९ हजार कोटींची थकबाकी
किंगफिशर बिअर उत्पादक युनायटेड ब्रुअरीजमध्ये विजय माल्ल्याचा ८.१ टक्के हिस्सा आहे. स्मिरनॉफ व्होडका उत्पादक युनायटेड स्पिरिट्समध्येही त्याचा ०.०१ टक्के हिस्सा आहे. विजय माल्ल्यावर बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. मार्च २०१६ मध्ये त्याने देश सोडला. तो सध्या ब्रिटनमध्ये आहे. १८० कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं विजय माल्ल्याविरोधात १ जुलै रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं.