Join us

मैदानाबाहेरही विराटच अव्वल, PUMA सोबत तब्बल 100 कोटींचा करार

By admin | Published: February 20, 2017 9:50 AM

भारतीय कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेरही तुफान फटकेबाजी करत असून त्याने पुमासोबत तब्बल 110 कोटींचा करार केला आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - भारतीय कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेरही तुफान फटकेबाजी करत असून त्याने पुमासोबत तब्बल 110 कोटींचा करार केला आहे. विशेष म्हणजे 100 कोटींचा करार करणार विराट कोहली पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. पुमाने विराट कोहलीसोबत आठ वर्षासाठी हा करार केला आहे. या करारासोबत विराट कोहली ग्लोबल अॅम्बेसेडर झाला असून धावपटू उसेन बोल्ट, असाफा पॉवेल, फुटबॉलपटू थिअरी हेन्री यासारख्या दिग्गजांच्या पंगतीत जाऊन बसला आहे.
 
 
या कराराअंतर्गत विराट कोहलीला निश्चित रक्कम तसंच व्यवसायात झालेल्या नफ्यातील रॉयल्टी दिली जाणार आहे. विराट कोहली पुमाची सिग्नेचर लाईन लाँच करणार असून त्यासाठी विशेष लोगो वापरण्यात येणार आहे. जाहिरातींवर वर्षाला तब्बल 12 ते 14 कोटी खर्च केले जाणार आहेत. 
(सचिन तेंडुलकरकडून खास शैलीत विराटच्या बॅटचं कौतुक)
(कर्णधारपद सोडल्याने धोनीच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूत घसरण)
 
पुमासोबत जोडले जाणं हे माझ्यासाठी सन्मान आहे. पुमासोबत जोडल्या गेलेल्या सर्वोत्कृष्ट खेळाडू उसेन बोल्ट, पेले, मॅराडोना, थिअरी हेन्री यांच्या यादीत माझं नाव सामाविष्ट होणं हादेखील माझ्यासाठी सन्मान असल्याचं विराट कोहली बोलला आहे. 
याअगोदर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि महेंद्रसिंग धोनी यांनी स्पोर्ट्स आणि इतर एजन्सींसोत अनेक वर्षांसाठी 100 कोटींचा करार केला होता. सचिन तेंडूलकरने आपल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत 50 हून जास्त ब्रॅण्डसोबत करार करत 500 कोटींची कमाई केली. 1995 मध्ये सचिनने वर्ल्डटेलसोबत 30 कोटींसाठी करार केला होता, जो 2001 मध्ये कायम ठेवत रक्कम दुप्पट करण्यात आली होती. 
 
तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचे कर्णधारपद भुषवणाऱ्या कोहलीची ब्रॅण्डव्हॅल्यू यावर्षी गगनाला भिडली आहे. आपल्या कंपनीची ओळख आणि इतरांपेक्षा वेगळे स्टेटस निर्माण करण्यासाठी कंपन्या आपल्या जाहिरातीसाठी लोकप्रिय चेह-यांना पसंती देतात. त्यात क्रिकेटपटू आणि सिनेअभिनेत्याकडे जास्त ओढ जाहिरातदारांची असते. गेल्या वर्षभरात कोहलीने केलेली अफलातून कामगिरी आणि त्याच्या आकर्षक लूकमुळेच जाहिरातदारांची पसंती त्याला जास्त आहे.
 
क्रिकेटच्या मैदानात विराट कोहली दमदार फॉर्मात आहे. खोऱ्याने धावा जमा करतो आहे. त्याचप्रमाणे कोहलीची ब्रॅण्डव्हॅल्यू मैदानाबाहेर देखील गगनाला भिडली आहे. कोहलीने गेल्या वर्षात ब्रॅण्डव्हॅल्यूच्या माध्यमातून तब्बल ६०० कोटींची कमाई केल्याची माहिती डफ अँड फेल्प्सने जाहीर केलेल्या आकडेवारीतून पुढे आली आहे. यादीत कोहली दुस-या स्थानावर असून बॉलिवूडचा किंग शाहरुख खान अजूनही अव्वल स्थानावर आहे.
 
भारतीय संघाचा कर्णधार झाल्यानंतर कोहलीच्या ब्रॅण्डव्हॅल्यूमध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे डफ अँड फेल्प्सचे संचालक अविरल जैन यांनी सांगितले. चार मालिकांमध्ये सलग चार द्विशतक ठोकण्याचा पराक्रम कोहलीने ठोकून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. याबाबत कोहलीने सर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकले. सध्याच्या घडीला कोहली २० पेक्षा अधिक ब्रॅण्डचे प्रमोशन करत आहे. यात जिओनी, अमेरिकन टुरिस्टर अशा मोठ्या ब्रॅण्डचाही समावेश आहे.