Join us  

विराट अनुष्काची मोठी घोषणा! मराठमोळ्या रितेश देशमुख, जेनेलियाच्या पावलावर पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 1:50 PM

विराट कोहली, अनुष्का शर्मा नव्या व्यवसायात; गुंतवणुकीसोबत ब्रँड ऍम्बेसेडर म्हणूनही काम करणार

नवी दिल्ली: प्लांट बेस्ड मीट उत्पादनं निर्मिती क्षेत्रातील भारतीय कंपनी ब्ल्यू ट्राईबमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहलीनं गुंतवणूक केली आहे. दोघांनी ब्ल्यू ट्राईबमध्ये मोठी गुंतवणूक केलेली असून हेच दाम्पत्य कंपनीसाठी ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून काम करेल. लोकांनी त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल करावेत, जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी पावलं उचलावीत यासाठी आवाहन करण्याचं काम ब्ल्यू ट्राईबनं सर्वप्रथम केलं. पर्यावरणाच्या समस्या सोडवण्यासाठी ब्ल्यू ट्राईबनं प्लांट बेस्ड मीटचा विषय मांडला होता.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पशुप्रेमी आहेत. ते दोघेही शाकाहाराचा पुरस्कार करतात. प्लांट बेस्ड मीट उत्पादनं खातात. त्यामुळेच त्यांनी ब्ल्यू ट्राईबमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. विराट आणि अनुष्का अनेक वर्षांपासून शाकाहारी आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते प्लांट बेस्ड मीट खातात. 

ब्ल्यू ट्राईब वनस्पतीवर आधारित मांस उत्पादनांची निर्मिती करते. या मांसाची चव खऱ्याखुऱ्या मांसासारखी असते. मात्र त्यासाठी मटर, सोयाबीन, डाळ, धान्य आणि शाकाहारी साहित्यांचा वापर करण्यात येतो. वनस्पतीवर आधारित मांस खाल्ल्यानं शरीराला प्रथिने, व्हिटामिन आणि अन्य पोषक घटक मिळतात.

शाकाहारी पदार्थांच्या सहाय्यानं ब्ल्यू ट्राईब वनस्पतीवर आधारित मांस उत्पादनं तयार करते. संदीप सिंह आणि निक्की अरोरा सिंह यांनी या कंपनीची स्थापना केली. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनीदेखील अशाच प्रकारची कंपनी स्थापन केली आहे. ही कंपनीदेखील वनस्पतीवर आधारित मांस उत्पादनांची निर्मिती करते.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मारितेश देशमुखजेनेलिया डिसूजा