Go Digit IPO: शेअर बाजारातून बंपर कमाईसाठी तुम्ही योग्य वेळी अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करणं गरजेचं आहे. शेअर बाजार असो, सोनं असो किंवा प्रॉपर्टीतील गुंतवणूक असो, गुंतवणुकीच्या दृष्टीनं वेळ खूप महत्त्वाची असते आणि कोणत्याही पर्यायात गुंतवणूक करून कमावण्यासाठी योग्य वेळ पाहून गुंतवणूक करणं गरजेचं असतं. टीम इंडियाचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी ४ वर्षांपूर्वी जनरल इन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक केली होती. ही कंपनी आता शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत आहे आहे. विशेष म्हणजे कंपनी ज्या किमतीत आयपीओ आणत आहे, त्या तुलनेत विराट आणि अनुष्कानं अत्यंत कमी किमतीत या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे.
बंपर कमाईची अपेक्षा
४ वर्षांपूर्वी केलेल्या या गुंतवणुकीतून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना बंपर कमाई होण्याची शक्यता आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये कंपनीत गुंतवणूक केली होती. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी २०२० मध्ये गो डिजिट जनरल इन्शुरन्सचे शेअर्स ७५ रुपयांना विकत घेतले होते. विराट कोहलीनं गो डिजिटचे २.६६ लाख इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. त्याची किंमत २ कोटी रुपये होती. तर अनुष्काशर्मानं ५० लाख रुपयांत ६६६६७ इक्विटी शेअर्स खरेदी केलेले.
२.५ कोटींची केलेली गुंतवणूक
विराट कोहली आणि अनुष्का शर्मानं गो डिजिट जनरल इन्शुरन्समध्ये २.५ कोटींची गुंतवणूक केली होती. कंपनी १५ मे रोजी आपला आयपीओ आणणार आहे. आयपीओसाठी २५८ ते २७२ रुपये प्रति शेअर असा प्राइस बँड निश्चित करण्यात आलाय. अशा परिस्थितीत विराट कोहली आणि अनुष्काला गो डिजिट आयपीओच्या इश्यू प्राइसनुसार २६२ टक्के परतावा मिळू शकतो.
२६२ टक्के परतावा
आयपीओच्या प्राईजच्या हिशोबानं विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या शेअर्सच्या मूल्याची गणना केली तर विराटच्या २.६६ लाख शेअर्सची किंमत ७.५ कोटी रुपये आणि अनुष्का शर्माच्या शेअर्सचं मूल्य १.८१ कोटी रुपये होतं. दोघांच्याही गुंतवणूकीचं मूल्य आता ९ कोटींपेक्षा अधिक झालंय. या आयपीओचं प्रीमिअम लिस्टिंग झाल्यास गुंतवणूकदार मालामाल होऊ शकतात. कंपनीनं २६५१ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी २५८ ते २७२ रुपये प्रति शेअरचा प्राईज बँड निश्चित केलाय.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)