ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - क्रिकेटचे मैदान गाजवल्यानंतर आता विराट कोहली नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. आगामी तीन वर्षांत विराट कोहली देशभरात ७५ ठिकाणी जिम सुरु करणार असून यासाठी सुमारे १९० कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.
भारतातील जिम आणि फिटनेस सेंटर क्षेत्राचा झपाट्याने विकास गोत असून सध्या या क्षेत्रातील ख्यातनाम फिटनेस सेंटरची देशभरातील उलाढाल सुमारे १,३०० कोटी रुपयांच्या घरात आहे. या क्षेत्रातील मागणी बघता विराटनेही फिटनेस सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्नरस्टोन स्पोर्टस अँड इंटरटेनमेंट (सीएसइ) या कंपनीच्या विराट जिम सुरु होणार आहे. सीएसइ ही कंपनी कोहलीसाठी काम बघते. याच कंपनीच्या मदतीने कोहली आता उद्योग क्षेत्रात पाऊल टाकत आहे.
विराट कोहलीच्या जिम व फिटनेस सेंटरचे नाव चिसेल फिटनेस असे असेल. आगामी तीन वर्षात चिसेलच्या देशभरात सुमारे ७५ शाखा सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे चिसेलचे डायरेक्टर सत्या सिन्हा यांनी सांगितले. जिममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम फिटनेस एक्स्पर्टना या जिममध्ये आणण्यासाठी बोलणी सुरु आहे असेही सूत्रांनी सांगितले. क्रिकेटनंतर आता कोहलीची ही नवी इनिंग कितपत यशस्वी होते याची उत्सुकता निर्माण झाली आहे.