Join us

बिटकॉइनसह व्हर्चुअल करन्सी पोंझी स्कीमसारखी - अर्थ मंत्रालय 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 8:33 PM

बिटकॉइनसह व्हर्चुअल करन्सीमध्ये व्यवहार करणा-या भारतीय गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. बिटकॉइनला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही किंवा याची सुरक्षा नाही.

नवी दिल्ली : बिटकॉइनसह व्हर्चुअल करन्सीमध्ये व्यवहार करणा-या भारतीय गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. बिटकॉइनला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही किंवा याची सुरक्षा नाही. बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणे मोठे धोकादायक असून याला सरकार किंवा रिझर्व्ह बॅंकेकडून परवानगी देण्यात आली नाही, असे अर्थ मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, जेवढा पोंझी योजनांमध्ये गुतंवणूक करण्याचा धोका आहे, तेवढाच बिटकॉइन सारख्या व्हर्चुअल करन्सीमध्ये गुंतवणूक करणाचा आहे. यामध्ये गुंतवणूकदार, विशेषकरुन किरकोळ ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या कष्टाची कमाई अवघ्या काही क्षणात नाहीशी होईल. त्यामुळे ग्राहकांनी याबाबत सतर्कता बाळगली पाहिजे. कारण, अशा पोंझी योजनामध्ये अडकणार नाहीत. व्हर्चुअल करन्सीला डिजीटल स्वरुपात स्टोर केले जाते. त्यामुळे हॅकिंग, पासवर्ड विसरणे आणि व्हायरस यासारख्या धोक्याची शक्यता असते. बिटकॉइन आणि इतर व्हर्चुअल करन्सीची किंमत पूर्णपणे सट्टेबाजीवर आधारित आहे. त्यामुळे याच्या किंमतीत मोठा चढ-उतार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत बिटकॉइनसमवेत काही व्हर्चुअल करन्सीचे मूल्य वाढल्याचे दिसून आले होते. मात्र, अर्थ मंत्रालयाने याबाबत भीती व्यक्त केलीय की, अशाप्रकारच्या करन्सीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जाऊ शकतो. शिवाय, तस्करी, ड्रग्ज यांच्या व्यापारासाठी आणि बेकायदेशीर पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्यासाठी होऊ शकतो.दरम्यान, रिझर्व्ह बॅंकेनंतर आता अर्थ मंत्रालयाने सुद्धा बिटकॉइनबाबत गुंतवणूकदारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याआधी रिझर्व्ह बँकेने  गुंतवणूकदारांना सतर्क करत बिटकॉइनपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. बिटकॉइनच्या प्रलोभनाला बळी पडू नका असे आवाहन केले होते. 

टॅग्स :बिटकॉइन