गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये झूम कॉलवर अवघ्या तीन मिनिटांत ९०० कर्मचाऱ्यांना तुमचा आजचा शेवटचा दिवस, म्हणत कामावरून काढून टाकणारा विशाल गर्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याची कंपनी आता आणखी ४००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. यामुळे युद्ध आणि महागाईच्या काळात बेटर डॉट कॉम नाव असलेल्या या कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवकर वाईट वेळ येणार आहे.
Better.com चे सीईओ आणि संस्थापक विशाल गर्ग यांनी एका Zoom कॉलदरम्यान कर्मचाऱ्यांना नारळ दिला होता. तसंच याचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. यानंतर विशाल गर्ग यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली होती. आता तीन महिन्यांनी पुन्हा एकदा ही कंपनी चर्चेत आली आहे.
बेटर डॉट कॉम या आठवड्यात ४००० कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. टेक क्रंच वेबसाइटने याची पुष्टी केली आहे. यानुसार कंपनी आपला पन्नास टक्के स्टाफ कमी करणार आहे. कंपनीत जवळपास ८००० लोक काम करतात. यापैकी निम्मे कर्मचारी काढून टाकले जाणार आहेत. महागाई आणि कोरोना महामारीच्या काळात ग्राहक ऑनलाईन पर्यायांकडे वळल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
विशाल गर्ग हे बेटर.कॉम कंपनीचे संस्थापक आणि सीईओ आहेत. ही कंपनी एक डिजिटल फर्स्ट होम ओनरशिप कंपनी आहे. Better.com चे सीईओ विशाल गर्ग जवळपास एक महिन्याच्या विश्रांतीनंतर परतले आहेत. ते परत आल्यापासून गर्ग यांच्यावर खूश नसलेल्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे राजीनामे सुरू झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गर्गच्या परतल्यानंतर, कंपनीत कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम करणारी सारा पियर्स आणि वरिष्ठ उपाध्यक्ष इमॅन्युएल सांता-डोनाटो यांनीही लगेच कंपनी सोडली.